Sun, Jul 21, 2019 00:18होमपेज › Kolhapur › कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,  रत्नागिरीतील प्रमुख मार्ग होणार दुपदरी

कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,  रत्नागिरीतील प्रमुख मार्ग होणार दुपदरी

Published On: Feb 08 2018 1:44AM | Last Updated: Feb 08 2018 1:04AMकोल्हापूर ः विठ्ठल पाटील

कोल्हापूर जिल्हा सिंधुदुर्ग, रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांसह सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडणार्‍या प्रमुख रस्त्यांच्या विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला असून त्याची निविदाही प्रसिद्ध केली आहे. 335.57 किलोमीटरच्या या रस्त्यांसाठी 2051.61 कोटी रुपयांची ही निविदा असून कामाचा आदेश मिळताच गतीने विकास करण्याची अट आहे.

कोल्हापूर आणि कोकण जोडणारे सर्वच रस्ते सह्याद्रीच्या ऊंच रांगांतून आणि अवघड वळणांचे आहेत. त्यापैकी कोल्हापूर-आंबा-रत्नागिरी महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे. त्याचीही निविदा गेल्याच महिन्यात प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर कोल्हापूर-गगनबावडा-तळेरे, विटा-अणुस्कुरा, रेडी-आंबोली-गडहिंग्लज-आजरा आणि आजरा-संकेश्‍वर या मार्गांसाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे. हे सर्वच मार्ग अत्यंत खडतर आणि धोकादायक वळणाचे आहेत. ही वळणे काढण्याबरोबरच काही ठिकाणी बोगद्यांसह रुंदीकरण केले जाणार आहे. किमान दुपदरी किंवा त्याहून अधिक रुंदीकरण असेही नियोजन असल्याचे महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.


रेडी-सावंतवाडी-आंबोली या घाट रस्त्यातून वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. कोल्हापूर, निपाणी, संकेश्‍वर येथून गोव्याकडे जाणार्‍या वाहनांची याच घाटातून वर्दळ सुरू आहे. वाहतुकीचा भार पाहता हा घाटरस्ता अत्यंत तोकडा पडत असल्यानेच त्याच्या रुंदीकरणाची तरतूद करण्यात आली आहे. हाच रस्ता पुढे आजरा आणि तेथून संकेश्‍वरपर्यंत रुंद आणि मजबूत केला जाणार आहे. जवळपास 82 किलोमीटरच्या या रस्त्यासाठी 708 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे.

करूळ घाटात बोगदा

कोल्हापूरहून गगनबावडामार्गे कोकणात जाणारा करूळ घाटही अत्यंत धोकादायक समजला जातो. पावसाळ्यात तर या घाटात सर्रास दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. अरुंद आणि कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची भीती असल्याने जीव मुठीत घेऊनच या घाटातून प्रवास करावा लागतो. कोल्हापूरपासून तळेरेपर्यंत 82 किलोमीटरच्या या महामार्गाच्या सुधारणेसाठी आणि घाट रुंदीकरण व बोगद्यासाठी मिळून 418 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे.

विटा-अणुस्कुरा-राजापूर हा रस्ता तीन जिल्ह्यांना जोडणारा आहे. कराड-कोकरूड-मलकापूर-येळवण जुगाईमार्गे अणुस्कुरा ते राजापूर जाणारा हा रस्ता मलकापूरपासून राजापूरपर्यंत पूर्ण घाटरस्ता आहे. हा रस्ताही सातारा-सांगली-कोल्हापूर-रत्नागिरी अशा चार जिल्ह्यांना जोडणारा आहे. अत्यंत महत्त्वाचा असणारा हा रस्ता सध्या खूपच अरुंद आहे. मलकापूरपासून अणुस्कुरा घाटमार्गे राजापूरपर्यंत तर हा रस्ता अवघ्या तीन ते चार मीटरचाच असून रुंदीकरणाची अत्यंत गरज होती.

विटा-अणुस्कुरा या 138 किलोमीटरसाठी 705 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण-हेळवाक मार्गासाठी 219.87 कोटी रुपयांची निविदा असून त्याद्वारे 46.57 किलोमीटरचा रस्ता विकसित होणार आहे. याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यापासून सांगली जिल्ह्यातील जतपर्यंतचा मार्गही दुपदरी आणि प्रशस्त होणार आहे. हाच मार्ग विटा-कराड-अणुस्कुरा या मार्गाला मिळणार आहे.

रस्ते विकासाला प्राधान्य :  ना. चंद्रकांत पाटील

रस्त्यांचा विकास झाल्याशिवाय राष्ट्राचा विकास नाही, हे ओळखूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खास योजना आखली आहे. महाराष्ट्रातीलही अनेक रस्ते या योजनेत समाविष्ट करण्यासाठी आपण आग्रह धरला. विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणार्‍या रस्त्यांची स्थिती अत्यंत नाजूक आहे. एक-दोन वर्षांत हे सर्व रस्ते रुंदीकरणासह मजबूत होऊन वाहतुकीसाठी आदर्श ठरतील. दळणवळणाच्या सुविधेमुळे या परिसरातील शेती, व्यापारासह मत्स्य व इतर माल वाहतूक सुरळीत आणि वेळेवर व्हावी, हा यामागचा उद्देश असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

रस्ते, लांबी आणि आर्थिक तरतूद अशी 

सांगोला-जत, विटा-अणुस्कुरा : 138 कि.मी., 705.49 कोटी. 
रेडी-आंबोली-गडहिंग्लज-आजरा-संकेश्‍वर :  82 कि.मी., 708 कोटी.
कोल्हापूर-गगनबावडा-तळेरे : 79 कि.मी., 418.25 कोटी. 
चिपळूण-हेळवाक : 46.57 कि.मी., 219.87 कोटी.