Fri, Apr 26, 2019 09:21होमपेज › Kolhapur › ‘विद्यार्थी विमा संरक्षण कवच’ निर्णयाचे स्वागत

‘विद्यार्थी विमा संरक्षण कवच’ निर्णयाचे स्वागत

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 12:24AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यातील दोन कोटी विद्यार्थ्यांचा विमा उतरवून त्याचे संरक्षण विद्यार्थ्यांना व पालकांना देण्याच्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे कोल्हापूरच्या शिक्षण क्षेत्रातून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोलाचा हातभार लावणार्‍या या योजनेची तळागाळापर्यंत अंमलबाजवणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे नूल (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी दोन कोटी विद्यार्थ्यांना विमा संरक्षण व आई-वडिलांच्या अपघाती मृत्यूमुळे शिक्षण थांबवावे लागल्यास, विमा कंपनीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत केले जाईल, अशी घोषणा केली. यावर शिक्षण क्षेत्रातून स्वागताच्या प्रतिक्रियांचा सूर उमटत आहे. यातील काही निवडक प्रतिक्रिया..

विद्यार्थ्यांना अपघाती संरक्षण विमा कवच देण्याचा शासनाचा निर्णय चांगला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही. गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. योजनेची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
- एस. डी. लाड, सभाध्यक्ष, 

शैक्षणिक व्यासपीठ

शासनाने विद्यार्थ्यांना विमा संरक्षण कवच देऊन त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. हे शिक्षण क्षेत्रासाठी उचललेले क्रांतिकारी पाऊल आहे. याचे आम्ही स्वागत करतो.
- सुरेश संकपाळ, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ

विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय विद्यार्थी हिताचा आहे. छोटे-मोठे अपघात घडतात. अशावेळी विद्यार्थी सुरक्षेच्या द‍ृष्टिकोनातून हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. आई-वडिलांच्या पश्‍चात विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी वानवा होणार नाही.
- प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना

विद्यार्थ्यांना विमा कवच देण्याचा शासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यास खर्‍या अर्थाने विद्यार्थ्यांना लाभ होईल.
- विनोद चौगुले, पालक

विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देणारा शासनाचा निर्णय वाड्या-वस्त्यांवरील ग्रामीण विद्यार्थ्यांना दिलासा देणारा आहे. पालकांच्या अचानक अपघाती मृत्यूमुळे शिक्षण प्रवाहातून बाहेर जाणार्‍या मुलांना पुन्हा शिक्षणाची संधी मिळेल. 
- संदीप मगदूम, अध्यापक जि.प. शाळा

विद्यार्थांना विमा कवच संरक्षण देण्याचा निर्णय स्तुत्य आहे. धावपळीच्या युगात वाहनांची संख्या वाढल्याने अपघातांचे प्रमाणदेखील वाढत आहे. शासनाच्या या निर्णयाचा विद्यार्थ्यांना नक्‍कीच फायदा होईल. 
- स्नेहल तारे, मुख्याध्यापिका, प्रायव्हेट हायस्कूल