Mon, Apr 22, 2019 22:30होमपेज › Kolhapur › विमानतळास राजाराम महाराजांचे नाव देऊन वचनपूर्ती : चंद्रकांत पाटील

विमानतळास राजाराम महाराजांचे नाव ही वचनपूर्ती : चंद्रकांत पाटील

Published On: Jan 18 2018 1:43PM | Last Updated: Jan 18 2018 1:58PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

उजळाईवाडी विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल असून कोल्हापूरसाठी ही अभिमानाची बाब आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव विमानतळास देण्याबाबत महिन्यापूर्वी घोषणा केली होती आणि आज त्याचा मंत्रिमंडळात ठराव करून वचनपूर्ती केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ना. पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे कर्तृत्व मोठे होते. मात्र, त्यांचे अपुरे काम पूर्ण करण्याचे कार्य छत्रपती राजाराम महाराजांनी केले.

वाचा : कोल्‍हापूरच्या विमानसेवेचे शिल्‍पकार छत्रपती राजाराम महाराज

राजर्षी शाहू महाराजांचे विचार व वारसा त्यांनी पुढे चालविला. कोल्हापूर संस्थानमध्ये दळण-वळण व वाहतुकीच्या द‍ृष्टीने व्यापार वाढीसाठी विमानतळ असावे, या हेतूने उत्तुंग व उल्लेखनीय असे प्रयत्न छत्रपती राजाराम महाराजांनी केले. 1930 ते 35 या कालावधीत विमानतळाचे काम सुरू केले. त्यासाठी 170 एकर जमीन संपादित केली. विमानतळाचे उद्घाटन 4 मे 1940 ला छत्रपती राजाराम महाराजांच्याच हस्ते झाले आणि तेथून पुढे कोल्हापूर खर्‍या अर्थाने जगाच्या पटलावर गेले. जिल्ह्यातील उद्योग व शेती क्षेत्राला विकासाची झेप घेण्यासाठी प्रयत्न छत्रपती राजाराम महाराजांनी केले. त्या कार्यकर्तृत्वाची दखल शासन घेणार असल्याचे 17 डिसेंबर 2017 मध्ये आपण सांगितले होते. राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल भारतीय जनता पक्षानेच घेऊन त्यांचा योग्य सन्मान केला आहे. लवकरच केंद्राकडून यासाठी मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

वाचा :  कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव

निर्णयाचे स्वागत : खासदार धनंजय महाडिक

विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा शासनाने घेतलेला निर्णयाचे मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. हा निर्णय म्हणजे जनभावनेचा निर्णय आहे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. कोल्हापूर ते मुंबई ही विमानसेवा सर्वप्रथम राजाराम महाराजांनी सुरू केली. यासाठी अनेक संघटना, तरुण मंडळे, चेंबर ऑफ कॉमर्स यांनीही पाठपुरावा केला होता. याला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.