Fri, May 24, 2019 02:37होमपेज › Kolhapur › निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट

निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट

Published On: Jan 16 2018 2:10AM | Last Updated: Jan 15 2018 10:53PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

‘ई’ वॉर्डसह कोल्हापूर शहरातील निम्म्याहून अधिक भागात सोमवारी पाण्याचा ठणठणाट राहिला. अनेक ठिकाणी महापालिका अधिकारी-कर्मचार्‍यांना कळवूनही पाण्याचे टँकर न आल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. पाणीपुरवठा विभागातील भोंगळ कारभारामुळे बोजवारा उडाला. कसबा बावडा व कळंबा फिल्टर हाऊस येथून चार टँकरद्वारे 16 ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात आला. दरम्यान, मंगळवारीही शहरातील अनेक भागात पाणी येणार नसल्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

शहरातील रिंगरोडवरील कणेरकरनगर पहिला बस स्टॉप येथील 400 मि.मी. व्यासाची सी.आय. पाईपलाईनची गळती काढण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने ‘ए’ वॉर्डमध्ये सोमवारी व मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने पत्रकाद्वारे कळविले होते. मात्र ‘ए’, ‘ई’ वॉर्डसह निम्म्याहून अधिक भागात पाण्याचा ठणठणाट राहिला. शहरात इतरत्र अचानक पाणी न आल्याने महिलावर्गाची चांगलीच तारांबळ उडाली.