होमपेज › Kolhapur › थेट पाईपलाईन निधी मिळणार कधी?

थेट पाईपलाईन निधी मिळणार कधी?

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 13 2018 12:12AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : सतीश सरीकर  

थेट पाईपलाईन योजनेसाठी केंद्र शासनाने गेल्या वर्षी 85 कोटी मंजूर केले. पहिल्यांदा 19 कोटी 19 लाख 82 हजार व नंतर 65 कोटी 88 लाख अशी रक्‍कम राज्य शासनाकडे वर्गही करण्यात आली; परंतु अद्यापही ती रक्‍कम महापालिकेला मिळाली नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. परिणामी, ‘थेट पाईपलाईनचा निधी मिळणार कधी?’ अशी अवस्था झाली आहे. निधी लवकर मिळाल्यास योजना लवकर मार्गी लागण्यास मदत होणार आहे.  

यापूर्वी पहिल्या टप्प्यात योजनेसाठी केंद्र शासनाने 170 कोटी 16 लाख 40 हजार रुपये दिले होते. योजनेतील आपल्या शेवटच्या हिश्श्याचे केंद्राने 85 कोटी मंजूर केले आहेत. 425 कोटी 41 लाखांची योजना धरून केंद्र शासनाने आतापर्यंत आपल्या 60 टक्के हिश्श्याचे एकूण 255 कोटी 24 लाख दिले आहेत. राज्य शासनाने आपल्या 20 टक्के हिश्श्यातील 25 कोटी दिले आहेत. तर, महापालिकेल्याने आपल्या 20 टक्के हिश्श्यातील 22 कोटी योजनेत जमा केले आहेत. 

केंद्र शासनाच्या यूआयडीएसएसएमटी कार्यक्रमांतर्गत 24 डिसेंबर 2013 ला कोल्हापूरसाठी थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली. सुमारे 53 कि. मी. लांबीच्या पाईपलाईनचे काम आहे. ठेकेदार कंपनीला 24 ऑगस्ट 2014 ला महापालिकेने वर्कऑर्डर दिली असून, 26 ऑगस्ट 2014 ला योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. काम पूर्ण करण्याचा कालावधी 30 महिन्यांचा होता. त्यातील 27 महिने कामासाठी व तीन महिने योजनेच्या चाचणीसाठी होते. कामासाठीचा कालावधी 22 नोव्हेंबर 2016 ला संपला. चाचणीसाठी 22 फेब्रुवारी 2017 पर्यंत मुदत होती. ती मुदतही उलटून गेली. अद्याप योजनेचे 35 टक्केही काम पूर्ण झालेले नाही. विविध शासकीय खात्यांच्या परवानग्या न मिळाल्याने योजनेचे काम रखडले आहे. कंपनीने नोव्हेंबर 2018 पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे; परंतु पाणीपुरवठा विभागाने मे 2018 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.