Tue, Jul 16, 2019 01:55होमपेज › Kolhapur › चिकोत्रा खोर्‍यात पाण्यासाठी धावाधाव

चिकोत्रा खोर्‍यात पाण्यासाठी धावाधाव

Published On: Feb 12 2018 1:52AM | Last Updated: Feb 11 2018 11:47PMहमीदवाडा : मधुकर भोसले

चिकोत्रा प्रकल्पातील अपुर्‍या पाणीसाठ्याच्या झळा आता खोर्‍यामध्ये तीव्रतेने जाणवत आहेत. उन्हाळ्याची दाहकता वाढत जाईल त्याप्रमाणे खोर्‍यामध्ये पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. विशेषत: शेतीसाठी शेतकरी नदीपात्रामध्ये खड्डे खोदून तसेच विहिरींमध्ये आडवी छिद्रे (बोअर) मारून पाणी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या पाण्यासाठी इतकी अवस्था आहे तर पुढे एप्रिल - मे ला या झळा आणखी तीव्र असणार यात शंका नाही. 

गेल्या दशकापासून चिकोत्राचा पाणीप्रश्‍न प्रतिवर्षी गंभीर बनत चालला आहे. पूर्वी खोर्‍यामध्ये ऊस शेतीचे प्रमाण अत्यल्प होते. त्यावेळी प्रकल्पामधील कमी पाणीसाठा देखील अडचणीचा ठरत नव्हता. किंबहुना त्यावेळी उपसाबंदी देखील लागू नसायची. मात्र, जसजशा सहकारी व खासगी उपसा सिंचन योजना सुरू झाल्या व ऊस शेती मोठ्याप्रमाणात वाढली. तसा पाणीप्रश्‍न गंभीर होत गेला. 
चिकोत्रा प्रकल्पाचे जलस्त्रोत हे खूपच कमकुवत असल्याने धरण भरण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. गेल्या 17 वर्षांत फक्त तीन वेळा हे धरण पूर्णक्षमतेने भरले. यावर्षी पावसाळा संपला तेव्हा प्रकल्पात 61 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध होता. त्यानंतर नोव्हेंबर पासून महिन्यातून एकदा पाणी सोडण्याची आवर्तने सुरू झाली व सध्या हा साठा 40 ते 42 टक्क्यांवर आला आहे. अशावेळी पिके वाचवण्याचे आवाहन शेतकर्‍यांपुढे आहे.

प्रकल्पातून सोडलेले पाणी उपसाबंदी असतानाही चोरून अनेक शेतकरी उपसतात. त्यामुळे उपसाबंदी उटल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांतच संपूर्ण पात्र कोरडे पडते. अशावेळी शेतकर्‍यांनी नदीपात्रातच जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदले आहेत व त्यामध्ये जे थोडेफार पाणी मिळेल ते पिकाला दिले जाते. एकदा खोदलेला खड्डा पाणी आल्यानंतर काही प्रमाणात मुजतो; पण नंतर तो पुन्हा थोड्याफार प्रमाणात शेतकरी उपसतात. याबरोबरच ज्यांच्या विहिरी आहेत. तिथे देखील पाणीपातळी खालावत चालली आहे. अशावेळी पाणी शोधण्यासाठी विहिरीच्या भिंतीला आडव्या बोअर मारून प्रयत्न केला जात आहे. हे काम प्रामुख्याने कर्नाटकातील मजूर करत आहेत. एकूणच चिकोत्रा खोर्‍यामध्ये पाण्यासाठी शेतकरी धावाधाव करत असल्याचे चित्र सध्या आहे. याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. नदीपात्र कोरडे पडल्यानंतर पुढील चार - पाच दिवसांनंतर नळांना पाणी बंद होते. अशावेळी ही पाण्याची भटकंती सुरू होते. काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी विकतही घेतले जात आहे.