Wed, Sep 19, 2018 16:26



होमपेज › Kolhapur › ...तर शहराचा पाणीपुरवठा बंद

...तर शहराचा पाणीपुरवठा बंद

Published On: Mar 01 2018 1:38AM | Last Updated: Mar 01 2018 12:12AM



कोल्हापूर : प्रतिनिधी 

वारंवार मागणी करून आणि नोटीस बजावूनही थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणार्‍या महापालिकेस जलसंपदा विभागाने पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. थकबाकी 5 मार्चपर्यंत न भरल्यास पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. 21 कोटी 94 लाख 54 हजार रुपयांची थकबाकी त्वरित भरा, अशी अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. 

पंचगंगा नदीतून महापालिका नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपसा करते. या पाण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे दरमहा महापालिकेला बिल पाठविण्यात येते. मात्र, महापालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाची थकबाकी मोठ्या प्रमाणात थकविली आहे. 

महापालिकेकडे 21 कोटी 94 लाख 54 हजार रुपयांची थकबाकी आहे. डिसेंबर 2018 पर्यंत केवळ पाणीपट्टीची रक्कम 19 कोटी 22 लाख 55 हजार 130 रुपये आहे. तर जानेवारी 2018 या महिन्याची 26 लाख 71 हजार 339 रुपयांची थकबाकी आहे. दंड स्थानिक उपकर विलंब शुल्क अशी एकूण 21 कोटी 94 लाख 54 हजार दोन रुपये थकबाकी आहे. या थकबाकीसंदर्भात जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंत्यांनी आयुक्तांची 18 जानेवारी 2018 रोजी भेट घेऊन थकबाकी भरण्याची विनंती केली आहे. या बैठकीत काही रक्कम भरण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र, अद्यापही थकबाकी भरलेली नाही. थकबाकीची रक्कम पाहता जलसंपदा विभागाने आता महापालिका प्रशासनास अंतिम नोटीस बजावली आहे. थकबाकी भरण्यास 5 मार्च ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. 5 मार्चनंतर कोणत्याही क्षणी महापालिकेचा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. 

या नोटीसची प्रत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर, आ. अमल महाडिक यांच्यासह जिल्हाधिकार्‍यांनाही पाठविण्यात आली आहे.