होमपेज › Kolhapur › तिन्ही धरणे अजूनही तुडुंब

तिन्ही धरणे अजूनही तुडुंब

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 1:55AM

बुकमार्क करा

कौलव : राजेंद्र दा. पाटील

राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरणांत तुडुंब पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एक टी.एम.सी. जादा पाणीसाठा असून लांबलेल्या पावसामुळे पाण्याचे एक आवर्तन बचावले आहे.
राधानगरी तालुक्यातील राधानगरी (8.36 टी.एम.सी.) काळम्मावाडी (28 टी.एम.सी.), तुळशी (3.85 टी.एम.सी.) अशा तीन धरणांची चाळीस टी.एम.सी. पाणीसाठवण क्षमता आहे. गेल्या दोन वर्षांत पाऊस प्रमाणात झालेली घट, वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा वाढलेला खप यामुळे मे महिन्याच्या अंतिम चरणात काहीअंशी पाणीटंचाई निर्माण झाली होती. 
धरणात पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर जवळपास 64 वर्षांनंतर प्रथमच गेली दोन वर्षे ऐतिहासिक बेंझर व्हिला खुला झाला होता. दोन वर्षांपूर्वी तर भोगावतीवर कधी नव्हे ती उपसाबंदी लागू केली होती. तर कोल्हापूरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी तुळशी धरणातील पाण्याची मदत घ्यावी लागली 
होती.
यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे तिन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. काळम्मावाडी धरणात 25 टी.एम.सी.पाणीसाठा झाला होता. यावर्षी नोव्हेबर अखेरपर्यत पावसाने हजेरी लावल्यामुळे पाणी वापराचे एक आवर्तन बचावले आहे. एका आवर्तनासाठी राधानगरी व काळम्मावाडीतून प्रत्येकी किमान दिड व तुळशी धरणातून अर्धा टी.एम.सी.पाणी खर्च होते. 

मात्र, यंदा लांबलेल्या पावसामुळे तिन्ही धरणातील मिळून तीन ते साडेतीन टी.एम.सी.पाण्याची बचत झाली आहे. गतवर्षी दिनांक 13 डिसेंबर रोजी तिन्ही धरणात मिळून 32.68 टी. एम. सी. पाणीसाठा होता. यंदा याच तारखेला 33.68 टी.एम.सी. पाणीसाठा आहे. या तारखेला प्रत्येक धरणातील पाणीसाठा टी.एम.सी.मध्ये पुढीलप्रमाणे 
आहे. 
कंसातील आकडे गतवर्षीचे आहेत. राधानगरी 7.45 (6.83), काळम्मावाडी 23.03 (22.71), तुळशी 3.20 (3.14) तिन्ही धरणात डिसेंबरच्या मध्यापर्यंत मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे योग्य नियोजन व्यवस्थित केल्यास मे अखेर पाणीपुरवठा होण्यास अडथळा येणार आहे. 

राधानगरी, काळम्मावाडी व तुळशी धरणातील पाण्याचा वापर प्रामुख्याने सिंचनासाठी होतो. त्याशिवाय जवळपास दहा बारा साखर कारखाने, शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल या तीन औद्योगिक वसाहतीसह अनेक छोट्या-मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे तिन्ही धरणातील मुबलक पाणीसाठ्यामुळे यावर्षीचा उन्हाळा सुसह्य होणार आहे.