Wed, Mar 27, 2019 04:14होमपेज › Kolhapur › जलयुक्‍त शिवारसाठी बेरोजगारांना यंत्रसामग्रीसाठी मिळणार कर्ज  

जलयुक्‍त शिवारसाठी बेरोजगारांना यंत्रसामग्रीसाठी मिळणार कर्ज  

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 1:08AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : डी. बी. चव्हाण

जलयुक्‍त शिवार योजनेतील मातीच्या कामासाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी कामे रखडण्याची शक्यता असते. यातून शासनाचा खर्च वाढतो, हे कमी करण्यासाठी शासनाने जलसमृद्धी यंत्रसामग्री व्याज अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण सहकारी संस्था, बेरोजगार तरुण, नोंदणीकृत गट आणि विविध कार्यकारी संस्था यांना ही यंत्रसामग्री (जेसीबी) खरेदी करण्यासाठी शासन वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध करून देणार आहे. तसेच त्याचे पाच वर्षांचे व्याज शासन भरणार आहे. यातून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत अनेक कामे प्रस्तावित केली जातात, यासाठी शासन कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देत असते; पण या कामांसाठी लागणारे मजूर मिळत नाहीत. त्यामुळे ही कामे रखडतात. या कामांसाठी आता यंत्रांचा वापर करून  ती वेळेत मार्गी लावण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी बेरोजगार तरुणांच्या संस्था, विविध कार्यकारी संस्था यांच्यामार्फत जेसीबी मशिन खरेदी करण्याची शासनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी शासन संबंधितांना जास्तीत जास्त 17 लाख 60 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणार आहे. या कर्जाचे पाच वर्षांतील 5 लाख 90 हजार रुपयांचे व्याज शासन भरणार आहे. पहिल्या टप्प्यात या योजनेचा कालावधी 31 मार्च 2018 पर्यंत राहील. इच्छुकांनी या कालावधीत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत. याला मिळणारा प्रतिसाद आणि राज्यात उपलब्ध होणारी संस्था विचारात घेऊन या योजनेचा कालावधी वाढविण्याचा शासन विचार करणार आहे.