Wed, Mar 27, 2019 02:19होमपेज › Kolhapur › पंचगंगा नदीत धुतली जातात रुग्णालयातील कपडे

पंचगंगा नदीत धुतली जातात रुग्णालयातील कपडे

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 25 2018 9:52PMकोल्हापूर : अनिल देशमुख

पंचगंगा नदीत चक्‍क रुग्णालयातील कपडे धुतली जात आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. कपडे, जनावरे, वाहने धुणे हे सर्व प्रकार रोखायला हवेत, त्याकरिता महापालिकेवर कठोर कारवाई करायला हवी, असेही या अहवालात म्हटले आहे. हे सर्व प्रकार तातडीने थांबवा, त्यासाठी पर्यायी व्यवस्था करा असे आदेश जिल्हा प्रशासनाने महापालिकेला दिले आहेत. मात्र, त्याबाबत महापालिकेला काहीच गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.

पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढत आहे. अनेक ठिकाणी पाणी दूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेवर सीआरपीसी कलम 133 नूसार कारवाई करण्याची मागणीही प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने केली होती. यासर्व पार्श्‍वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचगंगा प्रदूषणाबाबत अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला आहे. पंचगंगेत सांडपाणी मिसळत असलेल्या सर्व ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून ‘प्रदूषण’च्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी अहवाल तयार केला आहे. या अहवालात वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालात पंचगंगा प्रदूषण रोखण्याबाबत महापालिका गंभीर नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. पंचगंगा नदी घाटावर चक्‍क रुग्णालयातील कपडे धुतले जात असल्याचे या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले आहे. रुग्णालयात वापरलेली कपडे, रुग्णांसाठी वापरलेली कपडे, शस्त्रक्रिया आदीसह विविध ठिकाणची कपडेही थेट पंचगंगेच्या पाण्यातच धुतली जात असून, त्याची सर्व घाण थेट पंचगंगेत मिसळत असल्याचे समोर आले आहे.

पंचगंगा नदीवरील कपडे,जनावरे, वाहने धुणे रोखणे महापालिकेला शक्य आहे. मात्र, त्याबाबत ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. याबाबत महापालिकेवर कठोर कारवाई करावी असेही या अहवालात म्हटले आहे. दरम्यान याबाबत महापालिकेने कपडे धुण्यासाठी जाऊळाचा गणपती मंदिर शेजार, गंजीवली खण, रमणमळा  व इराणी खण क्रमांक 2 या चार ठिकाणी परीट समाजातील लोकांकरीता कपडे धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही नागरिकांकडून कपडे, जनावरे, वाहने धुण्यात येतात, त्यांची कपडे, वाहने, जनावरेही जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई तसेच अनेकदा फौजदारी कारवाई करण्यात आल्याचा खुलासा उपायुक्तांनी केला आहे. 

यासर्व प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने पंचगंगा नदीतील जनावरे, वाहने आणि कपडे धुणे तातडीने बंद करावेत, त्याबाबतची पर्यायी व्यवस्था तत्काळ करावी असे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. या आदेशाची दखल न घेतल्यास गंभीर कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.