Fri, Jul 19, 2019 20:43होमपेज › Kolhapur › वारणा पाणी संघर्ष चिघळणार?

वारणा पाणी संघर्ष चिघळणार?

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 15 2018 11:26PMइचलकरंजी : प्रतिनिधी

‘वारणे’चे हक्‍काचे पाणी मिळवण्यासाठी इचलकरंजीकरांनी सोमवारी (14 मे) रस्त्यावर उतरून अभूतपूर्व एकीचे दर्शन घडवले. कडकडीत बंद पाळून तसेच प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढून वारणाकाठच्या विरोधात संघर्षासाठी आम्ही सज्ज आहोत, असा इशाराच दिला. कोणत्याही परिस्थितीत योजना मार्गी लागून वारणेचे पाणी इचलकरंजीत आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार सर्व राजकीय पक्षांनी आपापले झेंडे बाजूला ठेवून एकदिलाने केला आहे. त्यामुळे आता पुढील काळात ‘वारणे’चा संघर्ष तीव्र होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, इचलकरंजीसाठी वारणा योजनेचा पर्याय सुचवणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. 

इचलकरंजी शहराला कृष्णा व पंचगंगा नळपाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या दोन्ही योजना कालबाह्य झाल्यामुळे वारणेचा पर्याय पुढे आला. शासनाने ‘अमृत’ अभियानातून 70.30 कोटींची वारणा नळपाणी पुरवठा योजना मंजूर केली. मंजुरीचे सर्व सोपस्कार पार पडले असून मक्‍तेदाराला वर्कऑर्डरही देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दूषीत पाण्याशी झगडणार्‍या इचलकरंजी शहराला वारणेमुळे एक नवा शुद्ध व मुबलक पाणी मिळण्याचा स्रोत निर्माण झाला आहे. काविळीसारख्या जीवघेण्या आजारामुळे 40 हून अधिक नागरिकांना आजवर जीव गमवावा लागला आहे, तर अनेकांना कायमचे जीवघेणे आजार जडले आहेत. त्यामुळे वारणेचे शुद्ध पाणी आवश्यकच बनले आहे. मात्र, जगात कुठेही पाण्यासाठी विरोध होत नाही. भारताकडून पाकिस्तानमध्ये जाणार्‍या सिंधू नदीलाही वाट मोकळी करून दिली जाते. संपूर्ण वारणाकाठाने मात्र इचलकरंजीला पाणी देण्यास तीव्र विरोध केला आहे. 

बागणी : प्रतिनिधी 

इचलकरंजीसाठी वारणा पाणी योजना करण्याच्या नावाखाली वारणा खोर्‍यातील शेतीचे पाणी पळविण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप करीत हे कारस्थान उधळून लावण्यासाठी गुरुवारी (दि. 17) वारणा परिसरातील 15 गावांत कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ढवळी (ता. वाळवा) येथे मंगळवारी वारणा परिसरातील गावांचे सरपंच, प्रमुख पदाधिकारी शेतकर्‍यांची व्यापक बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.ढवळीचे माजी सरपंच शरद पाटील यांनी सांगितले, इचलकरंजी शहरासाठी वारणा पाणीपुरवठा योजना झाल्यास वारणा काठच्या गावांमधील शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. या भागातील शेतकर्‍यांनी महागड्या व्याजदराने कर्ज काढून वारणेवरून शेतीसाठी पाणी योजना केल्या आहेत. मुळात वारणा पाणी योजनेसाठी चांदोली धरणात पाणी साठाच शिल्लक नाही. असे असतानाही ही पाणी योजना करण्याच्या हालचाली सुरू आहेत, पण वाळवा तालुका आणि वारणा खोरे हे क्रांतिकारकांचा आहे. कोणावर अन्याय करायचा नाही आणि कोणाचा अन्याय सहन करून घ्यायचा नाही, ही वारणा खोर्‍याची परंपरा आहे. इचलकरंजीसाठी कृष्णा तसेच पंचगंगा नदीतून पाणीयोजना सुरू आहेत.  सत्तेच्या जोरावर या पाणी योजनेच्या हालचाली होत आहेत, त्या हाणून पाडण्यासाठी बंद पाळावा.