Tue, Jul 23, 2019 11:05होमपेज › Kolhapur › वारणा बचाव कृती समितीच्या 52 जणांना अटक

वारणा बचाव कृती समितीच्या 52 जणांना अटक

Published On: May 05 2018 12:50AM | Last Updated: May 05 2018 12:16AMजयसिंगपूर : प्रतिनिधी

इचलकरंजी अमृत योजनेच्या  उद्घाटनास विरोध केल्याप्रकरणी गुरुवारी गुन्हा नोंद झालेल्या 89 पैकी जयसिंगपूर पोलिसांनी शुक्रवारी 52 जणांना अटक केली. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. जी. सावंत यांच्यासमोर दुपारी या सर्वांना हजर केले असता, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. दरम्यान, अद्याप 39 जणांना अटक करण्यात येणार आहे. चौदाशे अज्ञातांवरही गुन्हा नोंद आहे. 
या पार्श्‍वभूमीवर जयसिंगपूर पोलिस ठाण्यासमोर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गटागटांनी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. सर्वात शेवटी वारणा बचाव कृती समितीच्या मुख्य पदाधिकार्‍यांना पोलिस ठाण्यात न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिस ठाणे व न्यायालयासमोर मोठी गर्दी जमली होती.

इचलकरंजी नगरपालिकेच्या अमृत योजनेच्या उद्घाटनावेळी दानोळीसह कोथळी, उमळवाड आणि कवठेसारमधील शेतकरी आणि ग्रामस्थांनी रस्त्यावर टायर्स पेटवून नदीकडे जाणारा मार्ग दगडाची गरड टाकून बंद केला होता. यावेळी शिवाजी चौकात जवळपास साडेचार तास महसूल व पोलिस अधिकारी तसेच वारणा बचाव कृती समितीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा झाली. मात्र, योजनेचे उद्घाटन करू देण्यास जमावाने प्रतिबंध केला. या कारणातून या सर्वांवर जयसिंगपूर पोलिसांत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. 

आज दुपारी जयसिंगपूर पोलिसांत 52 जण  हजर झाले. दुपारी तीनच्या सुमारास मोठ्या बंदोबस्तात चार पोलिस वाहनातून न्यायालयात हजर करण्यात आले. यामध्ये  वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे, सर्जेराव शिंदे, राम शिंदे, केशव राऊत, रंजता राऊत, गुंडू दळवी, केशव हरीबा राऊत, उदय राऊत, सुकुमार सकाप्पा, दानोळीच्या सरपंच सौ. सुजाता शिदे, उपसरपंच गबू गावडे यांच्यासह 52 जणांची जामिनावर मुक्तता न्यायालयाने केली.