होमपेज › Kolhapur › हेरलेत घराची भिंत कोसळून महिला ठार

हेरलेत घराची भिंत कोसळून महिला ठार

Published On: Jul 17 2018 1:34AM | Last Updated: Jul 17 2018 12:14AMहेरले : वार्ताहर

हेरले येथे रिक्षाचालक रवींद्र बापू काटकर यांच्या घराची भिंत पहाटे कोसळून पत्नी अनिता काटकर यांचा मृत्यू झाला, तर रवींद्र काटकर यांच्यासह त्यांची दोन मुले गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.अचानक दोन्ही खोल्यांच्या भिंती अंगावर कोसळल्या. दगड आणि विटांचा मार या चौघांनाही बसला. अनिता यांच्या डोक्यास व पोटास मार बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या, तर रवींद्र काटकर व त्यांच्या दोन्ही मुलांच्या पायाला, हाताला मोठी दुखापत झाली आहे.

भिंती कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने शेजारील अमिर पेंढारी, गुंडू परमाज, रफिक पेंढारी, पोपट सुतार यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. चौघांच्या अंगावरील दगड, माती, विटांचा थर बाजूला करीत ढिगार्‍यातून चौघांना बाहेर काढले. उपचारासाठी सीपीआर कोल्हापूरला पाठविण्यात आले. उपचार सुरू असताना अनिता यांचा मृत्यू झाला. सलग चार दिवस पावसाची रिपरिप सुरू असल्याने परिसरात घराच्या भिंतीची पडझड होत आहे. अनिकेत हा दुचाकी मिस्त्री काम शिकत आहे, तर मुलगी शिवानी उच्च माध्यमिक शिक्षण घेत आहे. दोन्ही मुलांचे मातृछत्र हिरावले आहे. शासनाने कुटुंबास तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.