Wed, Jul 17, 2019 10:58होमपेज › Kolhapur › आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 23 2018 12:47AMकोल्हापूर : सुनील सकटे 

शासकीय कामकाजाबद्दल सरकारी काम अन् सहा महिने थांब, अशी म्हण रूढ झाली असतानाच मोठ्या संख्येने असणार्‍या रिक्‍त पदांमुळे कामांचा बोजवारा उडत आहे. अशातच एक जून रोजी मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी निवृत्त होत असल्याने सरकारी कार्यालयांत आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, अशी अवस्था झाली आहे. कामाचा निपटारा होण्यासाठी निवृत्तीचे वय वाढविण्यात यावे, अशी मागणी कर्मचारी, अधिकार्‍यांतून होत आहे. 

विविध सरकारी कार्यालयांत मोठ्या प्रमाणात रिक्‍त पदे आहेत. राज्यात साडेचार लाख पदे मंजूर असून, गेल्या अनेक वर्षांपासून तब्बल दीड लाख पदे रिक्‍त आहेत. अशी परिस्थिती असताना आता एक जून रोजी मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी निवृत्त होत आहेत. या दिवशी सुमारे दोन ते अडीच हजार कर्मचारी, अधिकारी निवृत्त होत आहेत. निवृत्तीचे हे प्रमाण पाहता आता सरकारी कार्यालयांत कर्मचार्‍यांची वानवा निर्माण होत आहे. मुख्यमंत्र्यांनी 36 हजार पदे भरण्याचे जाहीर केले असले, तरी निवृत्तीचे प्रमाण रिक्‍त पदे यांचा विचार केल्यास हे प्रमाण तोकडे आहे. अशातच ही प्रक्रिया राबविण्यासाठी किमान वर्ष ते दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता सरकारी कार्यालयांतून व्यक्‍त होत आहे.

अशा परिस्थितीत उपलब्ध कर्मचार्‍यांनाची सेवा वाढवून निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करावी, अशी मागणी होत आहे. यामुळे एकाच वेळी अनुभवी कर्मचारी, अधिकारी सेवेतून बाहेर जाणार नाहीत. त्यांच्या अनुभवाचा नवीन कार्यरत कर्मचारी अधिकार्‍यांना लाभ होईल, तसेच एवढ्या मोठ्या संख्येने निवृत्त होणार्‍या कर्मचारी, अधिकार्‍यांना देणी देण्यासाठी लागणारा पैसा सरकारला विकासकामांसाठी वापरता येणे शक्य आहे, अशी चर्चा सरकारी कार्यालयांत सुरू आहे.

कामकाजावर परिणाम

मुळात निवृत्ती, मृत, काम सोडून स्वेच्छानिवृत्ती अशा विविध कारणांनी ही पदे रिक्‍त आहेत. गेल्या अनेक वर्षांत रिक्‍त पदे भरण्यास प्रयत्न झाले नाहीत. तर नोकर भरतीही बंद आहे. अशातच दरमहा सुमारे एक हजार ते 1100 पदे निवृत्तीमुळे रिक्‍त होत असतात. परिणामी, एकाच कर्मचारी, अधिकार्‍यांकडे अनेक पदभार दिले जातात. पदभार दिल्याने दोन्हीकडील कामकाजावर परिणाम होतो.