Fri, Jul 19, 2019 07:33होमपेज › Kolhapur › गडहिंग्लजमध्ये 89 गावांत 114 दारूअड्डे?

गडहिंग्लजमध्ये 89 गावांत 114 दारूअड्डे?

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 18 2018 11:49PMगडहिंग्लज : प्रवीण आजगेकर

 गडहिंग्लज तालुक्यातील 89 गावांमध्ये तब्बल 114 दारूअड्डे बेकायदेशीरपणे सुरू आहेत. याची  माहिती पोलिस प्रशासन अथवा राज्य उत्पादन शुल्कला नाही, असे म्हणणेही धाडसाचे होईल. कधीतरी एखादी कारवाई करून केवळ ‘चमकोगिरी’ करण्याचा प्रकार सध्या सुरू असल्याने  सर्वसामान्य नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

गडहिंग्लज तालुक्यातील अनेक गावांमध्ये दारूबंदीची चळवळ जोर धरून 11 गावांमध्ये दारूबंदी झाली आहे.  गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ, हरळी बु., तेरणी, कळवीकट्टी, बसर्गे, नांगनूर, मुत्नाळ, दुंडगे, अत्याळ, मुगळी, हरळी खु. या गावांमध्ये दारूबंदीसाठी महिलांना मोठी चळवळ उभी करावी लागली होती.  यामुळे गडहिंग्लज तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात गेले असून अन्य गावांमध्येही  दारूबंदी  चळवळीला बळ देण्याचे काम सुरू आहे.

एका गडहिंग्लज तालुक्यातील 89 गावांमध्ये बेकायदेशीर दारूचे तब्बल 114 अड्डे असून या सर्व अड्ड्यांची खबर राज्य उत्पादन शुल्कला असतानाही केवळ दुसरीकडे बोट दाखवून मलिदा खाण्याचा प्रकार वाढल्याचे सर्वसामान्यांतून बोलले जात  आहे. दारूअड्ड्यांबाबत विविध गावांतील लोकांनी राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांकडे तक्रार केल्यास कारवाईची जबाबदारी पोलिसांची आहे, त्यांच्याकडे जा, अशी जबाबदारीची ढकलाढकली करण्यासही येथील अधिकारी मागेपुढे पहात नाहीत.