Sat, Jul 20, 2019 15:52होमपेज › Kolhapur › गुर्‍हाळ मालक वजन काटा चालकांकडूनही मापात पाप

गुर्‍हाळ मालक वजन काटा चालकांकडूनही मापात पाप

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वडणगे : वार्ताहर

साखर कारखाने उसाच्या वजनात काटामारी करून शेतकर्‍यांची लूट करतात हे जगजाहीर असताना आणि यावर शेतकरी संघटनांकडून तक्रारी होत असताना, आता काही गुर्‍हाळ मालक खासगी वजन काटाचालकांना हाताशी धरून ऊस ट्रॉलीचे वजन करताना निरनिराळ्या क्लृप्त्या वापरून शेतकर्‍यांच लूट करीत आहेत. निगवे दुमाला (ता. करवीर) परिसरातील काही शेतकर्‍यांनी वडणगे (ता. करवीर) येथील एका खासगी काटाचालकाला काटामारी करताना रंगे हाथ पकडल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. या काटामालकाविरुद्ध संबंधित शतेकरी व रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वजनमापे विभागाकडे तक्रारही दाखल केली आहे. वजन मापे विभाग यावर काय कारवाई करणार याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

गुर्‍हाळ मालक परिसरातील खासगी वजन काट्यावर उसाचे वजन करून या उसाला टनाला 2800 ते 2850 रु. दर देतात. याच उसाला कारखान्यांकडून सध्या सरासरी पहिली उचल रु. 3000 च्या आसपास मिळते. नाही तरी कारखाना काटामारी करतोच, असा विचार करून टनामागे 200 रु. चा तोटा करून शेतकरी वजनावर ऊस गुर्‍हाळाला घालतात. गुर्‍हाळ मालक हा गावातीलच असल्याने शेतकरी त्याच्यावर विश्‍वास ठेवतात. या विश्‍वासामुळेच शेतकरी उसाच्या पहिल्या खेपेचे वजन बघितल्यावर पुन्हा वजन काट्यावर वजन बघायला जात नाहीत. गुर्‍हाळ मालकावर विश्‍वास ठेवणार्‍या शेतकर्‍यांना गुर्‍हाळ मालक आणि वजन काटाचालक यांच्यात कशी सांगड असते, याची माहिती नसते. शेतकर्‍यांच्या विश्‍वासाचा गैरफायदा घेऊन हे गुर्‍हाळ मालक व वजन काटाचालक शेतकर्‍यांच्या घामाच्या दामावर डल्ला मारतात.

उसाचे वजन करताना वजनकाट्यात फेरफार न करता निरनिराळे फंडे वापरून रिकाम्या ट्रॉलीचे वजन वाढवून भरलेल्या ट्रॉलीचे वजन घटवतात. यासाठी उसावर ट्रॉलीचे वजन करताना गुर्‍हाळ मालकाकडून लहान ट्रॉलीचा वापर केला जातो. तर मोकळ्या ट्रॉलीचे वजन हे मोठी ट्रॅक्टर ट्रॉली वापरून केले जाते. त्यामुळे साहजिकच, रिकाम्या मोठ्या ट्रॉलीच्या वजनातून लहान उसाने भरलेल्या ट्रॉलीचे वजन वजा केल्यानंतर उसाचे वजन आपोआप घटते. यात टनामागे शेतकर्‍याला 310 ते 325 किलोचा फटका बसतो. काही वेळानंतर भरलेल्या व रिकाम्या अशा दोन्ही ट्रॉलीत घट करून वजनात दुहेरी घट केली जाते.

उसाने भरलेल्या ट्रॉलीची पुढची दाने चाके काटा प्लॅटफॉर्मच्या बाहेर ठेवूनही भरलेल्या ट्रॉलीतील उसाच्या वजनात घट केली जाते, अशी माहिती निगवे दुमाला येथील शेतकरी उत्तम पाटील यांनी दिली. एका ट्रॉलीमध्ये सरासरी 300 ते 325 किलो उसाची घट होते. साधारण एका रात्रीसाठी गुर्‍हाळावर चार ट्रॉली उसाची आवश्यकता असते. या चार ट्रॉल्यामध्ये 1200 किलो उसाची घट झाल्याने गुर्‍हाळ मालकाचा किमान 3500 ते 4000 रुपये फायदा होतो. याबाबत शेतकरी अनभिज्ञ असल्याने तो या फसवणुकीची शिकार ठरतो आहे. वडणगे येथील काटामारीच्या प्रकाराने फसवणुकीचा हा धंदा उजेडात आला आहे.