Thu, Jun 20, 2019 01:33होमपेज › Kolhapur › वडणगे स्मार्ट व्हिलेज बनविण्याचा निर्धार 

वडणगे स्मार्ट व्हिलेज बनविण्याचा निर्धार 

Published On: Dec 19 2017 1:58AM | Last Updated: Dec 18 2017 11:52PM

बुकमार्क करा

वडणगे ः वार्ताहर 

जनतेच्या सोईसाठी सर्व शासकीय कार्यालयांचे एकत्रीकरण करून सुसज्ज ग्रामसचिवालय उभारण्याचा मानस आहे. सांडपाणी, कचरा व्यवस्थापन हायमास्ट पथदिवे, वायफाय, सीसीटीव्ही, डिजिटल शाळा. याबरोबरच नेट बँकिंगसह डिजीटल व्यवहारावर भर देऊन वडणगे स्मार्ट व्हिलेज बनवू, असा निर्धार सरपंच सचिन चौगले, उपसरपंच सूरज पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केला. 
गावची विकासकामे आणि त्याबाबतचे नियोजन याची माहिती देण्यासाठी पहिले लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले आणि नवनिर्वाचित सदस्यांनी आयोजित केलेल्या वार्तालाप बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. 

सरपंच चौगले म्हणाले, नागरिकांची सर्व शासकीय कामे एकाच ठिकाणी व्हावी, यासाठी सर्व शासकीय कार्यालयांचे एकत्रीकरण करणे गरजेचे असून, त्यासाठी ग्रामसचिवालयाच्या माध्यमातून ते करण्याचा मानस आहे. भूमिअभिलेख, सर्कल कार्यालय गावात होण्यासाठी  प्रयत्न सुरू आहेत. सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य दिले जाईल. थकबाकीसाठी कडक पावले उचण्यात येणार असून, प्रथम नोटिसा पाठवून नंतर थकबाकीदारांची नावे डिजिटल फलकाद्वारे चौकात लावली जातील. तलाव सुशोभिकरण, मटण मार्केटचे नूतनीकरण, क्रीडांगण, चौकाचौकांत हायमास्ट दिवे, स्मशानभूमी विस्तारीकरण, महिला व युवक सक्षमीकरण यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. उपसरपंच सूरज पाटील, सदस्य सयाजी घोरपडे, दीपक व्हरगे, सदस्या शुभांगी पोवार यांनी  मुद्दे मांडले.