Thu, Apr 25, 2019 21:27होमपेज › Kolhapur › गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करा

गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करा

Published On: Mar 08 2018 2:05AM | Last Updated: Mar 07 2018 11:11PMकोल्हापूर : प्रतिनिधी

वृद्धांना धाक दाखवून लुबाडले जात आहे. टोळ्यांचे साम्राज्य विस्तारले आहे. चेनस्नॅचर्समुळे भीतीचे वातावरण आहे. गांजा विक्री जोमात आहे. पोलिस चौक्यांची मागणी होऊनही पूर्तता होत नाही. तरणी पोरं सराईत टोळ्यांना बळी पडत आहेत. छेडछाडीमुळे युवती त्रस्त आहेत. समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागल्याने पोलिस दलाने निर्णायक पावले उचलावीत. टोळ्यांची दहशत, काळ्या धंद्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्याचा निर्धार समाजातील सर्वच घटकांनी बुधवारी व्यक्त केला.

पोलिस आणि नागरिकांत समन्वय निर्माण करण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या शंभरावर व्यक्तींची बैठक बुधवारी सकाळी पोलिस मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत नागरिकांनी शहरासह जिल्ह्यातील तक्रारींचा पाढाच वाचला. प्रामुख्याने शहर, उपनगरांतील गुन्हेगारी टोळ्यांचे साम्राज्य, शस्त्रांच्या धाकावर होणारी लूट, पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाची फसवणूक, सावकारी प्रस्थ, गांजा, अमली पदार्थांची तस्करी, काळे धंदेवाल्यांच्या दादागिरीवर सर्वच घटकांनी परखड मते मांडली.

शहर, जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतील अपुर्‍या मनुष्यबळामुळे अधिकारी, कर्मचार्‍यांची परवड होत आहे. कोल्हापूर पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. पोलिस आयुक्तालय होणे काळाची गरज बनली आहे, असे टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी स्पष्ट केले.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, धान्य व्यापारी असोसिएशनचे सदानंद कोरगावकर, सरलाताई पाटील, सुरेश जरग, हर्षल सुर्वे, वसंतराव मुळीक, अनुराधा भोसले, नगरसेविका उमा इंगळे, अशोक देसाई, भरत ओसवाल, महेश सावंत, शुभांगी शिंत्रे, लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, राजेखान जमादार, संजय इंगळे, शुभांगी शिंदे, अभिजित पटवा, संदीप जिरगे आदींनी परखड मते व्यक्त केली. बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, श्रीनिवास घाटगे, पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, सतीश माने, कृष्णात पिंगळे, शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, डॉ. प्रशांत अमृतकर, सूरज गुरव, विनायक नरळे, पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे, अशोक धुमाळ आदी उपस्थित होते.