Thu, Apr 25, 2019 21:35होमपेज › Kolhapur › महिलांनी नकारात्मक मानसिकता झुगारावी : मीरा बोरवणकर

महिलांनी नकारात्मक मानसिकता झुगारावी : मीरा बोरवणकर

Published On: Mar 09 2018 7:43PM | Last Updated: Mar 10 2018 1:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी

महिलांनी नकारात्मक भूमिकेतून बाहेर पडून सक्षमपणे उभे रहावे, असा मोलाचा सल्ला जनतेचे अकृत्रिम प्रेम लाभलेल्या भारत सरकारच्या पोलिस संशोधन व विकास संस्थेच्या अध्यक्षा आणि निवृत्त पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी दिला. दैनिक ‘पुढारी’ व कस्तुरी क्लबच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या  ‘संवाद कर्तृत्वान व्यक्तिमत्त्वाशी’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शुक्रवारी सायंकाळी हॉटेल सयाजीच्या मेघ मल्हार हॉल  येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या ‘माझ्या आयुष्याची पानं’ या पुस्तकाचे प्रकाशन दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते करण्यात आले, तर मीरा बोरवणकर यांच्या देदीप्यमान कारकीर्दीचा पट विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीत उलगडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘माझ्या आयुष्याची पानं’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर बोलताना डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी, मीरा बोरवणकर यांच्या उल्लेखनीय कारकीर्दीचा गौरव केला. बोरवणकर या देशातील कर्तव्यदक्ष व धडाडीच्या पोलिस अधिकारी असल्याचे सांगून डॉ. जाधव म्हणाले की, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रणरागिणी ताराराणींचा वारसा सांगणार्‍या कोल्हापुरात कर्तृत्ववान महिलेचा गौरव होत आहे. युवती व महिलांसाठी रोल मॉडेल असलेल्या बोरवणकर या नेहमीच महिलांना प्रेरणा देत आल्या आहेत. 

बोरवणकर यांनी आदर्श मापदंड निर्माण केले : जाधव

उच्चपदावर काम करणारे पोलिस अधिकारी पिस्तुलाबरोबर हातात लेखणीही धरून प्रथितयश साहित्यिकाला लाजवेल, असे पुस्तक लिहू शकतात, हे मीरा बोरवणकर यांनी  ‘लिव्हज ऑफ लाईफ’ या पुस्तकातून दाखवून दिले आहे, तर त्यांची मुलाखत घेणारे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनीही हाच कित्ता गिरवत ‘मन में है विश्‍वास’, हे पुस्तक लिहिले आहे. ज्या काळात पोलिस खाते म्हणजे पुरुषांची मक्तेदारी होती, त्या काळात 1981 साली मीरा बोरवणकर आयपीएस झाल्या. त्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी आहेत. कर्तृत्वाबरोबरच त्यांचा दरारा असा की, त्यांनी आदर्श मापदंड तयार केले. मुंबईच्या क्राईम ब्रँचच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच खात्याचे प्रमुख होणार्‍या मीरा बोरवणकर या पहिल्या महिला पोलिस अधिकारी होत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 1997 साली त्यांना राष्ट्रपतिपदक देण्यात आले.  त्यांनी डॉक्टरेट व कायद्याची पदवी संपादन केली आहे. गुंडगिरी, दंगली, हिंसाचार आणि खतरनाक माफियांना लगाम घालत सर्वांना पुरेल अशी कामगिरी करणार्‍या मीरा बोरवणकर यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल.

कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा व दैनिक ‘पुढारी’च्या कार्यकारी संचालिका डॉ. सौ. स्मितादेवी जाधव यांनी मीरा बोरवणकर, विश्‍वास नांगरे-पाटील, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांचे स्वागत केले. यानंतर विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मीरा बोरवणकर यांची मुलाखत घेतली. 

आई-वडिलांच्या प्रेरणेने पोलिस दलात दाखल

आव्हानाने ठासून भरलेल्या पोलिस दलात यावेसे का वाटले? या प्रश्‍नाने नांगरे-पाटील यांनी मीरा बोरवणकर यांना बोलते केले. तेव्हा आपली मोठी बहीण आयकर खात्यात उच्च पदावर कार्यरत होती, तर भाऊ आयआयटीत शिकत होता. वडील सीमा सुरक्षा दलात होते. अशा कुटुंबात वाढत असताना केवळ आई आणि वडिलांच्या प्रेरणेमुळेच आपण पोलिस दलात दाखल झाल्याचे बोरवणकर यांनी अभिमानाने सांगितले. आपणही सुरुवातीला इंडियन ऑडिट अँड अकौंटस्मध्ये चांगल्या पदावर कार्यरत असूनही जीवनात काहीतरी आव्हानात्मक करावे, म्हणून आयपीएस होण्याचे ठरविले. त्याला घरातून प्रेरणा मिळाली. तू मुलगी आहेस. हे करू नको, ते करू नको, असे कधीही मला आई-वडिलांनी सांगितले नाही. मी जे-जे करीन, त्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला. म्हणूनच आपण काही करू शकलो, अशा शब्दांत बोरवणकर यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखविल्या.

पोलिस अधिकार्‍याचे जीवन खूपच विविधतेने भरलेले असल्याचे सांगताना बोरवणकर म्हणाल्या, कधी खुनाचा तपास करावा लागतो, तर दुसर्‍या दिवशी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळावी लागते. त्यामुळे या खात्यात काहीतरी शिकायला मिळते. 

नकारात्मकता झुगारा

तुम्ही महिला दिनाच्या निमित्ताने युवतींना काय संदेश द्याल? असे नांगरे-पाटील यांनी विचारता बोरवणकर यांनी नकारात्मकता झुगारून लावा, अशा एका वाक्यातच ठामपणे उत्तर दिले. मुळातच बर्‍याच युवतींमध्ये आपण कमी पडू, अशी भावना असते. खरं तर असे काहीच नाही; पण आपण उगाचच कारणे शोधत राहतो आणि समोर आलेले आव्हान पेलण्यास असमर्थता दाखवितो. असे आव्हान पेलण्यासाठी आपण प्रयत्नही करीत नाही. 

आव्हाने पेला

आपल्याच आयपीएसच्या प्रशिक्षणात आलेल्या खडतर अनुभवांचा दाखला देत बोरवणकर म्हणाल्या की, कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना मनात न ठेवता येणार्‍या प्रत्येक आव्हानावर मात करायला शिकले पाहिजे. त्याचबरोबर  शिक्षण आणि प्रशिक्षणात समोर येईल, त्या गोष्टीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. पुरुष कदाचित ताकद कमी असूनही आव्हानाला तोंड देण्याच्या मानसिकतेमुळे पुढे जातात; पण महिलांमध्ये खरोखरच क्षमता असूनही आव्हानाला तोंड देण्याची आणि परिस्थितीवर मात करण्याची मानसिकता नसल्यामुळे त्या मागे पडतात, असे आपल्याला वाटते. ही आव्हाने पेलल्याशिवाय महिलांना पुढे जाता येणार नाही. त्यामुळे आव्हान ही सकारात्मकता मानून पुढे गेले पाहिजे.

शिवीचा वापर केला नाही

मुलगी म्हणून वेगळी वागणूक मिळू नये, ही भावना आपण कायम जोपासली, मग पोलिस प्रशिक्षणात लांब केस कापणे असो किंवा अन्य कोणतीही गोष्ट असो, जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिकच असले पाहिजे, या मुद्द्यावर आपण ठाम होतो. चुकीची किंवा अनैसर्गिक गोष्ट होऊ नये, यासाठी आग्रही राहताना बोरवणकर यांनी, आपण कधीही जीवनात शिवीचा वापर केला नाही, असे सांगताच सभागृहात एकच हश्या पिकला.

पोलिसांचे कौशल्य वाढवावे

महिलांना सेवेत 33 टक्के आरक्षण असतानाही आजही पोलिस दलात केवळ दहा ते अकरा टक्के महिला पोलिस असल्याचे सांगून बोरवणकर यांनी पोलिसांना सेवेत असतानाही प्रशिक्षणाची गरज असल्याचे व त्यासाठी वरिष्ठांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. पोलिसांचे कौशल्य सातत्याने वाढविण्यावर भर दिला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

गुन्ह्यात शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असते. अशा प्रसंगात केवळ पोलिसांनाच जबाबदार धरले जाते. माध्यमे आणि जनतेच्या मनात पोलिसांविषयी राग असतो; पण गुन्हे दाखल करणे, त्यासाठी न्यायालयात चांगल्याप्रकारे बाजू लढविणे, न्यायालयात पुरेशा संख्येने न्यायमूर्तींच्या नेमणुका करणे आणि कारागृहाचे प्रशासन चांगल्या प्रकारे चालविणे, हे सारे घटक गुन्हे शाबित करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. आपण एका बलात्काराच्या प्रकरणात न्यायालयात बाजू मांडण्यासाठी बाहेरच्या गावातून वकील आणले होते, याचा दाखला देत अशी परिस्थिती असू नये, असेही त्या म्हणाल्या.

महिला अत्याचारात वाढ

महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे आणि 14 ते 18 वयोगटातील मुलींवर होणार्‍या अत्याचाराचे प्रमाण हे 35 टक्के आहे, हे सारेच गंभीर असल्याचे सांगताना विश्‍वास नांगरे-पाटील यांनी यावर कोणती उपाययोजना आपण सुचवाल, अशी विचारणा केली. त्यावर बोरवणकर यांनी, महिलांवर होणारे 94 टक्के अत्याचार हे ओळखीच्या व्यक्तींकडूनच होत असल्याचे सांगून त्यापासून सावध राहण्याचा सल्लाही दिला.

पिढीतील अंतर हे अशा बाबी दूर करण्यास मदत करू शकते. याचे उदाहरण देताना बोरवणकर यांनी महाविद्यालयीन युवती ही आपल्या आईशी बोलत नव्हती. हे आपल्याला जाणवले. ती युवती पीडित होती. मात्र, अशा प्रकरणात न शिकलेली आई म्हणजे ‘भारत’ आणि शिकलेली मुलगी म्हणजे ‘इंडिया’ यातील अंतर दूर व्हायला हवे, असे सांगत बोरवणकर यांनी आई आणि मुलीतील संवाद जेवढा अधिक असेल, तेवढ्या अशा घटना कमी घडतील, असे ठाम प्रतिपादन केले. 

मुळातच कोणत्याही गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नका, असा मोलाचा सल्ला देताना अनेकवेळा या भूमिकेनेच महिलांचे नुकसान झाल्याचे त्या म्हणाल्या. 
यावेळी संजय डी. पाटील व प्रसाद कामत यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सौ. स्मितादेवी जाधव यांनी आभार मानले. समाजाच्या विविध थरांतील महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, त्याबद्दल आभार मानताना त्यांनी यापुढे महिला अधिक संघटितपणे आणि ताकदीने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी कस्तुरी क्लबच्या माध्यमातून कार्यरत राहतील, अशी ग्वाही दिली.

उपस्थित महिला-मान्यवर...

सौ. गीतादेवी प्रतापसिंह जाधव, महापौर सौ. स्वाती यवलुजे, सौ. शांतादेवी डी. पाटील, सौ. संयोगीताराजे छत्रपती, सौ. अरुंधती महाडिक, सौ. रूपाली नांगरे-पाटील, सौ. प्रकृती खेमनार, तहसीलदार सविता लष्करे, साधना झाडबुके, सौ. किशोरी आवाडे, सौ. सपना आवाडे, कविता घाडगे, विशाखा आपटे, डॉ. नीता नरके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर महिला आणि कस्तुरी क्लबच्या सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

नांगरे-पाटील यांची खुमासदार शैली...

स्वत: लेखक असलेले कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी खास कोल्हापुरी खुमासदार शैलीत केलेले निवेदन आणि मुलाखत घेताना घेतलेल्या फिरकीने उपस्थितांची दाद मिळविली. ना. धों. महानोर यांच्या कवितेपासून ते पंतप्रधानांच्या स्मार्ट पोलिसिंग या उपक्रमापर्यंत आणि पाळणा हलविणारे हात स्थिर असतात, असे सांगण्यापासून ते ‘दिन हूँ, रात हूँ, सांझ वाली बाँत हूँ...’ असे सांगत अनेक हृदयंगम प्रसंगही नांगरे-पाटील यांनी कथन केले. 

मीरा बोरवणकर व नांगरे पाटील : अशी रंगली जुगलबंदी

मीरा बोरवणकर आणि विश्‍वास नांगरे-पाटील या पोलिस अधिकारी आणि लेखक यांच्यातील रॅपिड फायरचा राऊंड म्हणजे आगळीवेगळी जुगलबंदीच ठरली. मुलाखतीच्या सुरुवातीलाच विश्‍वास नांगरे-पाटील हे घाबरल्यामुळे प्रश्‍नपत्रिका घेऊन आल्याचे बोरवणकर यांनी सांगताच एकच हशा पिकला, तर मुलाखतीचा शेवट आपण पत्नीला सोबत घेऊन आलो आहोत, असे नांगरे यांनी सांगताच सभागृहात पुन्हा हशाचे फवारे उडाले.

अशी रंगली प्रश्‍नोत्तरे

प्रश्‍न : पोलिस अधिकारी झाला नसता तर? 
उत्तर : निवांत जीवन जगले असते.
प्रश्‍न : आठवड्याच्या सुट्टीचे नियोजन काय?
उत्तर : निवांत झोपून राहणे.
प्रश्‍न : मीरा बोरवणकर यांच्या व्यक्‍तिमत्त्वातील सर्वात चांगला गुण?
उत्तर : एनर्जी.
प्रश्‍न : तांबडा-पांढरा रस्सा?
उत्तर : कोल्हापूर.
प्रश्‍न : निखिल (बोरवणकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव)
उत्तर : मदरहूड.
प्रश्‍न : चाईल्डहूड?
उत्तर : पंजाबच्या शेतात निवांतपणे भटकणे.
प्रश्‍न : युनिफॉर्म?
उत्तर : एम्पॉवरमेंट.
प्रश्‍न : जागतिक महिला दिन?
उत्तर : एकत्र येऊन चर्चा करणे.
प्रश्‍न : आवडते पंतप्रधान?
उत्तर : इंदिरा गांधी.
प्रश्‍न : पोलिस अधिकारी झाल्यास पहिली पसंती पंजाबला की महाराष्ट्राला?
उत्तर : दोन्हीकडे. एका राज्यात नोकरी दुसर्‍या राज्यात डेप्युटेशन.
प्रश्‍न : आपले प्राधान्य कशाला? आयएएस की आयपीएसला?
उत्तर : आयपीएस. कारण युनिफॉर्मची ब्युटी. 
प्रश्‍न : पुढच्या जन्मात मुलगी व्हायला आवडेल की मुलगा?
उत्तर : अर्थातच मुलगी.