Sun, Jun 16, 2019 12:52
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › विश्‍वास नेजदार यांना ‘गोकुळ’ सभेत मारहाण

विश्‍वास नेजदार यांना ‘गोकुळ’ सभेत मारहाण

Published On: Sep 13 2018 1:50AM | Last Updated: Sep 13 2018 1:50AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) करवीर तालुका संपर्क मेळाव्यात बुधवारी प्रचंड गोंधळ झाला. दूध संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपणी करणारे राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्‍वास नेजदार यांना मारहाण करण्यात आली. त्यातच एकाने नेजदार यांना खुर्ची फेकून मारली. काहींनी नेजदार यांना बाजूला नेल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, वार्षिक सभेच्या अपुर्‍या जागेवरून संचालक वसंत खाडे व माजी संचालक बाबासाहेब चौगले यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. फक्‍त करवीर तालुक्याच्या संपर्क सभेसाठीच ही जागा अपुरी पडत असताना सर्वसाधारण सभा या ठिकाणी कशाला घेता, असा जाब चौगले यांनी विचारल्यानंतर त्यांच्याही दिशेने कार्यकर्त्यांनी धाव घेतली. यावरून खाडे-चौगले यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.

वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी प्राथमिक दूध संस्थांच्या अडीअडचणी ऐकून घेण्यासाठी संपर्क सभा घेतल्या जात आहेत. बुधवारी करवीर तालुक्याची सभा ताराबाई पार्कातील संघाच्या कार्यालयात होती. या सभेची सुरुवातच वादावादीने झाली. करवीर तालुक्याचे संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने आल्याने सभागृह खचाखच भरले. त्यामुळे बसायला जागा न मिळाल्याने आ. सतेज पाटील समर्थक उभे होते. त्यांना बसण्याची सूचना अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी केली, त्यावरून वादाला सुरुवात झाली. त्यावर ही सर्वसाधारण सभा नाही, तुमची बैठक व्यवस्था करतो, असे पाटील सांगत असतानाच चौगले व वसंत खाडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हातवारे करून दोघांतील वाद रंगला. हा वाद शांत होतो न होतो, तोपर्यंत नेजदार यांच्या वक्‍तव्यावरून हाणामारीलाच सुरुवात झाली.

अहवालात संघ मल्टिस्टेट करण्यासाठीचा पोटनियम दुरुस्ती इंग्रजीतून छापली आहे. त्यावर टीका झाल्यानंतर संघाने याचा मराठी अनुवाद करून त्याच्या प्रती संस्थांना पाठवल्या. त्यावर अध्यक्षांना इंग्रजी वाचता येत नाही का, अशी टीका करणारे पत्रक मंगळवारी आ. पाटील समर्थकांनी प्रसिद्धीला दिले होते. त्याचा उल्लेख संघाचे अध्यक्ष पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणात केला. ते म्हणाले, सातवी पास असलेले वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होऊ शकतात, त्यामुळे इंग्रजी यायलाच पाहिजे, असे काही नाही. याच वाक्याचा संदर्भ घेऊन वसंतदादा कोटीत एक होते, तुम्ही त्या कोटीत नाही असे नेजदार म्हणताच, त्यांच्या अंगावर अर्वाच्य शिवीगाळ करत कार्यकर्ते धावून गेले. काहींनी त्यांना माराहाण केली, एकाने तर त्यांच्या डोक्यात खुर्ची मारली. काही जाणकारांनी नेजदार यांना कडे करून सभागृह बाहेर नेले, तरीही काही कार्यकर्ते त्यांच्या दिशेने खुर्च्या भिरकवताना दिसले. नेजदार यांना बाहेर नेल्यानंतर सभा सुरळीत सुरू झाली; पण तणाव शेवटपर्यंत कायम होता.

मल्टिस्टेटला विरोध

मल्टिस्टेटविषयी काही बोलायचे असल्यास सर्वसाधारण सभेत बोला, अशी सूचना अध्यक्ष पाटील यांनी केले; पण तरीही माजी संचालक चौगले यांनी यावर का बोलायचे नाही, पहिल्यांदा इंग्रजीत पोटनियम का छापला, नंतर मराठी प्रती छापल्या त्याचा खर्च सभासदांवर का, असे प्रश्‍न विचारले. त्यावर अध्यक्ष यांनी, तुम्ही दंगा करायलाच या सभेत आल्याचा टोला लगावला. सभा संपताना चौगले यांनी संघ मल्टिस्टेट करण्याला आपला विरोध असल्याचे सांगितले. गेल्यावर्षीसारखी सर्वसाधारण सभा होणार असली, तर आताच सांगा आम्हालाही तयारीने यावे लागेल, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील यांनी दिला.

सर्वसाधारण सभेत काय होणार?

एका तालुक्याच्या सभेत घडलेली हाणामारीची घटना म्हणजे 21 सप्टेंबर रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेत काय होणार याची झलकच आहे, अशी चर्चा आहे. सर्वसाधारण सभेला आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील स्वतः उपस्थित राहणार असल्याने ती सभाही वादळी ठरण्याची शक्यता आहे.

वैयक्‍तिक टीकेमुळे गोंधळ ः विश्‍वास पाटील

ही सभा सर्वसाधारण नाही, तालुक्यापुरती आहे, असे सभेच्या सुरुवातीपासून मी आणि रणजित पाटील सांगत होतो. बसून घ्या,  गोंधळ घालू नका, असे आवाहनही करत होतो; पण त्याचवेळी माझ्यावर वैयक्‍तिक टीका झाल्याने हाणामारीचा प्रकार घडला, असे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी सांगितले.