Wed, Aug 21, 2019 19:04होमपेज › Kolhapur › कसबा बीड ‘वीरगळीचं’ गाव 

कसबा बीड ‘वीरगळीचं’ गाव 

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 11:33PMकोल्हापूर : सागर यादव 

सातारा जिल्ह्यातील किकली हे गाव राज्यातील पहिले ‘वीरगळीचं गाव’ म्हणून नावारूपाला येत आहे. किकली ग्रामस्थ व युवकांच्या पुढाकाराने गावातील वीरगळ व सतिशिळांचे जतन-संवर्धन आणि संरक्षणाचे आदर्श कार्य सुरू आहे. किकली गावाच्या पार्श्‍वभूमिवर प्रदीर्घ इतिहासाचा वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बीड (ता. करवीर) हे गावही ‘वीरगळीचं गाव’ म्हणून नावारूपाला येऊ शकते. शेकडो वर्षांचा इतिहास जपण्याचे राष्ट्रीय कार्य करण्याची संधी ग्रामस्थांना यामुळे उपलब्ध होणार असल्याच्या प्रतिक्रिया इतिहासप्रेमींतून व्यक्‍त होत आहेत. 

इसवी सन 12 व्या शतकातील  शिलाहारांच्या  गंडरादित्य राजाची राजधानी म्हणून कसबा बीड (ता. करवीर) या गावाला महत्त्व आहे. या वैभवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा परिसरात आजही आपले अस्तित्व टिकवून उभ्या आहेत. 

लढाईच्या मैदानात पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाचा इतिहास सांगणारे स्मारक म्हणजे वीरगळ होय. जुन्या काळापासून अस्तित्वात असणार्‍या प्रत्येक गावांत असे वीरगळ शेकडो वर्षांची इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. कालओघात लोकांना इतिहासाचा विसर पडल्याने हे वीरगळ दुर्लक्षीत आणि दुरवस्थेत आहेत. अनेक ठिकाणच्या वीरगळांची मोडतोड झाल्याने ते इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. कसबा बीड, आरे, बहिरेश्‍वर, सावरवाडी या परिसरात ठिकठिकाणी अनेक वीरगळ, देवदेवतांच्या मूर्ती विखरल्या आहेत. यापैकी अनेक वीरगळ, मूर्ती सुस्थितीत आहेत. मात्र, अनेकांकडे प्रचंड दुर्लक्ष झाले असून त्यांची मोडतोड झाली आहे. शिल्लक असणार्‍या या वीरगळ, सतिशिळा व मूर्तींच्या जतन-संवर्धनाची मोहीम ग्रामस्थांनी तातडीने हाती घेणे गरजेचे आहे. इतरत्र विखुरलेले वीरगळ, सतिशिळा, मूर्ती सुरक्षीतपणे एकत्रित आणून त्यांचे महत्त्व सांगणारे फलक लावणे गरजेचे आहे. ग्रामस्थांना यासाठी पुरातत्त्व विभागानेही मार्गदर्शन आणि पाठबळ पुरविणे गरजेचे असल्याचे इतिहासप्रेमींतून बोलले जात आहे. 

कसबा बीड व आसपासच्या गावांत इतरत्र विखुरलेल्या वीरगळ, सतिशिळा यांचे केवळ पूजन न करता लोकांनी त्यांच्या जतनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या गोष्टी एकत्रित करून, त्यांच्या वर्गीकरणाबरोबरच त्यांच्याविषयी नव्या पिढीला माहिती देणारे फलक लावणे आवश्यक आहेत. या परिसरात स्त्री योद्धांचे वीरगळ, युद्धप्रकारातील विविधता दाखविणारे वीरगळ अशा वैशिष्ट्यपूर्ण वस्तूही आहेत. त्यांच्या जतनाची विशेष मोहीम राबविणे गरजेचे आहे. 
-अ‍ॅड. प्रसन्‍न मालेकर, प्राचीन मूर्ती अभ्यासक

कसबा बीडमध्ये सोन्याचा माळ आहे. तेथे आजही सोन्याची नाणी सापडतात. म्हणून या परिसरातील माती अनेकांनी ट्रक भरून नेली. शिवाय दुसर्‍या जिल्ह्यातील एका गावात उभारण्यात येणार्‍या मठाच्या सुशोभिकरणासाठी कसबा बीड मधून मोठ्या प्रमाणात दगडी मूर्ती नेण्यात आल्याचे स्थानिक लोक अभिमानाने सांगतात. वास्तविक पूर्वजांनी केलेले कर्तृत्व आणि घडविलेल्या इतिहासाची साक्ष देणार्‍या या गोष्टी आहेत. हा वारसा स्थानिक पातळीवरच जपला जावा. ही जबाबदारी सर्वस्वी स्थानिक युवकांची आहे. 
    -राम यादव, इतिहास अभ्यासक