Tue, Mar 26, 2019 01:50होमपेज › Kolhapur › उपाध्यक्षांसह दोन समित्यांचे पदाधिकारी बदलणार

उपाध्यक्षांसह दोन समित्यांचे पदाधिकारी बदलणार

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 27 2018 12:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अडीच वर्षे पदाधिकारी बदल होणार नसल्याचे सांगणार्‍या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांंच्यावर घटक पक्षांच्या दबावानंतर एकाच दिवसात म्हणणे मागे घेण्याची वेळ आली. गुरुवारी स्वत: बैठक घेऊन भाजप व जनसुराज्य वगळता उर्वरित घटक पक्षांनी पदाधिकारी बदलावेत, अशी सूचना त्यांना करावी लागली. उपाध्यक्ष, शिक्षण, महिला बालकल्याणच्या पदाधिकार्‍यांनी 1 ते 5 जून या कालावधीत राजीनामे सादर करावेत, असे सूचित  केले. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरज व कागलमधील कार्यक्रमांत पदाधिकारी अडीच वर्षांपर्यंत बदलले जाणार नसल्याचे वक्‍तव्य करून हालचाली थांबवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या कारभार्‍यांना दिल्या होत्या. यावरून खांदेपालटासाठी आग्रही असणार्‍या घटक पक्षांच्या सदस्य व नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती. सत्ता स्थापनेवेळी पालकमंत्र्यांनीच पुढाकार घेत खांदेपालटाचा शब्द दिलेला होता. या शब्दावर विश्‍वास ठेवून घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी, आवाडे, मिणचेकर या गटाने खांदेपालटासाठी दोन-तीन बैठकाही घेतल्या होत्या. सर्व ठरल्याप्रमाणे सुरू असताना अचानकपणे अशा प्रकारे शब्द फिरवल्यामुळे पालकमंत्र्यांविरोधात सदस्यांमधून नाराजी व्यक्‍त होत होती. 

या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी दुपारी सर्किट हाऊस स्वत: पालकमंत्र्यांनी बैठक घेतली. यात स्वाभिमानीतर्फे सावकर मादनाईक, भगवान काटे, शिवसेनेतर्फे आ. सुजित मिणचेकर, जि.प. सदस्य राहुल आवाडे, प्रवीण यादव, राजू मगदूम, राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत पालकमंत्र्यांनी भाजप व जनसुराज्य बदल करणार नाही. या पदावर सध्याचे अध्यक्ष, समाजकल्याण, बांधकाम सभापती कायम राहणार आहे. ही तीन पदे वगळून उपाध्यक्ष, शिक्षण, महिला बालकल्याणला राजीनामे देण्यास सांगू, त्यांच्या नेत्यांनी नावे निश्‍चित करावीत, आमचे सदस्य पाठिंबा देतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण सभापती अंबरिश घाटगे व महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. 

उपाध्यक्षपद शिवसेनेच्या नरके, तर शिक्षण घाटगे गटाकडे आहे. या बैठकीला आ. चंद्रदीप नरके व माजी आमदार संजय घाटगे हे दोघेही नव्हते. त्यांना बैठकीचे निमंत्रणही दिलेले नसल्याचे समजते. पण, त्यांच्या अनुपस्थितीत मात्र त्यांच्याकडील पदे काढून घेण्याचा निर्णय झाला. आ. नरके यांची समजूत काढण्याबाबतची जबाबदारी पालकमंत्र्यांनी स्वत: स्वीकारली. संजय घाटगे यांनीही नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे राजीनामे देऊ, असे सांगितले. 
पदाधिकारी बदलासाठी आढेवेढे घेत पालकमंत्री एकदाचे तयार झाले आहेत. पण, त्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्याचा मुहूर्त काढला आहे. 20 जूनला सव्वा वर्ष होत आहे. तत्पूर्वी 20 मे रोजी महापौर निवडणूक होणार आहे. महापौर निवडणूक भाजपने अस्मितेची केली आहे. याच वेळी जि.प. मध्ये बदलाच्या घडामोडींवरून घटक पक्षांतील नेते, सदस्यांची नाराजी वाढली आहे. काठावर बहुमत असतानाही ही नाराजी सध्याच्या घडीला पेलवणारी नसल्याने सावध झालेल्या पालकमंत्र्यांनी गुरुवारी स्वत:हून बैठक घेऊन घटक पक्षांची समजूत काढत आपण पाच वर्षे एकत्रच राहू, असे सांगून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. महापौर निवडणुकीपर्यंत जि.प.चे वातावरण शांत राहील, याचीही दक्षता पालकमंत्र्यांनी घेतल्याचे दिसत आहे.

यादव, मगदूम यांच्या नावांवर एकमत; ‘शिक्षण’साठी रस्सीखेच

उपाध्यक्षपदासाठी मिणचेकर गटाचे प्रवीण यादव, महिला बालकल्याणसाठी आवाडे गटाच्या वंदना मगदूम यांच्या नावांवर बैठकीत एकमत झाले आहे. शिक्षणसाठी मात्र नरके व सरूडकर गटांत रस्सीखेच असणार आहे. सरूडकर गटाकडून हंबीरराव पाटील, तर नरके यांच्याकडून मनीषा कुरणे व कोमल मिसाळ यांच्यासाठी आग्रह धरला जात आहे. 

Tags : Kolhapur,  vice presidents, two, vice presidents, will, replaced