Thu, May 28, 2020 12:53होमपेज › Kolhapur › कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपकडे मदतीचा ओघ सुरूच (video)

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले हजारो हात (video)

Published On: Aug 14 2019 11:28AM | Last Updated: Aug 14 2019 11:28AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप (केडीएमजी) च्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंगळवारी पुन्हा हजारो हात सरसावले. वस्तू, जेवण, खाद्यपदार्थ, स्वच्छतेसाठीचे साहित्य असे नानाविध प्रकारे दातृत्ववान लोक व संस्था पूरग्रस्त बांधवांच्या मदतीला धावून आले. स्वयंसेवा संस्थांनी श्रमदानात सहभाग घेतला. ‘केडीएमजी’कडे मदतीचा ओघ सुरूच असून त्याचे योग्य ठिकाणी वाटप होत असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

विलो कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट सुनील कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली 25 अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक 30 मड पंप तसेच किर्लोस्करचे तीन जनसेट घेऊन मदतकार्यासाठी दाखल झाले आहे. महापालिका, अर्थमूव्हर्स असोसिएशन, नगरसेवक राहुल चव्हाण यांनी बसंत-बहार टॉकीज परिसरात मदतकार्य केल्याची माहिती अभय देशपांडे यांनी दिली.

ललित गांधी फाउंडेशनची अ‍ॅम्ब्युलन्स सेवेत हजर झाली. पुण्याचे नामवंत सिमेंट डीलर दशरथ दिनकरजाधव यांनी 13 जीवनावश्यक वस्तू असलेले 500 शिदोरी पॅकेज दिले. बच्चनवेडे ग्रुपचे मनोज गुणे यांनी नित्यम दीपकम 100 ट्युब अँटिफंगल क्रीम दिल्या. कराडचे रहिवासी व सातारा जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांनी पाच हजार पाण्याच्या बाटल्या, ब्लँकेट, कपडे दिले. पैठण येथील सावन कृपाल रूहानी मिशनतर्फे पाणी बॉटल, कपडे आदी साहित्य पोहोच केले. सुनील श्रीमाळ यांनी गृहोपयोगी वस्तू दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेले पशुखाद्य चिखली ग्रामपंचायत समितीकडे देण्यात आले. प्रकाश मेहता यांच्या ‘स्फूर्ती’तर्फे एक हजार बॉटल पाणी मदत पाहोच झाल्याची माहिती डिस्ट्रिब्युशनचे मुख्य राजू निकम यांनी माहिती दिली. 

रमणमळा, मुक्‍त सैनिक वसाहत, दुधाळी, महावीर कॉलेज परिसरात सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत श्रमदान केले. यावेळी डॉक्टर असो.चे 12 सदस्य, बीव्हीजी कंपनीचे 85 कर्मचारी सहभागी झाले. या मोहिमेत अर्थ मूव्हिंग असोसिएशचे चार डम्पर व 12 ट्रॅक्टर तसेच महानगरपालिका कर्मचारी असे एकूण 200 पेक्षा अधिक लोकांचा सहभाग असल्याची माहिती उदय निचिते यांनी दिली.

स्वयंसेवक म्हणून सहभाग नोंदवा!

‘केडीएमजी’साठी श्रमदान करणार्‍या स्वयंसेवी संस्था व माणसांची नितांत गरज आहे. इच्छुकांनी पितळी गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या ‘केडीएमजी’च्या कार्यालयास भेट देऊन सहभाग नोंदवावा, असे आवाहन ‘केडीएमजी’ संयोजक इंद्रजित नागेशकर यांनी केले आहे