Wed, Mar 20, 2019 02:36होमपेज › Kolhapur › आम्हालाही हवे  सु‘रक्षाबंधन’

आम्हालाही हवे  सु‘रक्षाबंधन’

Published On: Aug 27 2018 1:14AM | Last Updated: Aug 26 2018 11:13PMकोल्हापूर : गौरव डोंगरे 

वासनांध नजरांचा सामना दररोज करावा लागतो. आधाराविना उपेक्षित जीवन जगावे लागते. मात्र, रक्षाबंधनाच्या सणाने आतापर्यंत जगण्याची उमेद दिली. भावाच्या नात्याने आतापर्यंत अनेक हात मदतीला धावले. खरंच आम्हालाही समाजाकडून ‘सुरक्षेचे बंधन’ मिळावे, अशा शब्दांत वारांगणा सखी संघटनेच्या अध्यक्षा शारदा यादव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

सावत्र आईच्या त्रासामुळे त्यांनी स्वत:चे घर सोडले. जन्माने मुस्लिम धर्मीय असल्या, तरी लग्नानंतर हिंदू धर्मात आल्या. पतीकडून शारदा यादव असे नाव मिळाले. तीन मुलींच्या जन्मानंतर पतीने साथ सोडली. रस्त्यावरचे जीवन जगून तीन मुलींचे संगोपन करण्याची वेळ आली; पण त्या डगमगल्या नाहीत. येणार्‍या प्रत्येक संकटाचा सामना करत त्यांनी संसार उभा केला. दोन मुलींची लग्ने केली. त्यांनी वारांगणांच्या समस्या जवळून पाहिल्या. त्यामुळेच ‘सखी संघटने’च्या माध्यमातून काम सुरू केले.

परजिल्ह्यांतून, परराज्यांतून महिला वारांगणा म्हणून कोल्हापुरात येतात. तेव्हा सखी संघटनेच्या माध्यमातून संरक्षण मिळते. शारदा यादव या अनेक महिलांची आई म्हणून जबाबदारी पार पाडतात. महिलांचे आजारपण, अडीअडचणी त्या सोडवितात. 

अल्पवयीन मुलींना परावृत्त केले


अल्पवयात या व्यवसायाकडे आलेल्या 23 मुलींना आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून परावृत्त करण्यात आले आहे. त्यांची वये केवळ 18 ते 20 अशी होती. मुलींना नर्सिंग कोर्स, शिलाई काम, लोणची-पापड व्यवसाय या माध्यमातून पैसे मिळू लागल्याने त्या वेश्या व्यवसायातून बाहेर पडल्या आहेत. एवढेच नाही, तर अनेक मुलींचे विवाह संस्थेने पार पाडले आहेत.