Mon, Jun 17, 2019 03:03होमपेज › Kolhapur › ‘व्हॅलेंटाईन डे’ची आज धूम 

‘व्हॅलेंटाईन डे’ची आज धूम 

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 14 2018 1:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी

फ्रेंडशिप आणि लव्हशिप हे तरुणाईचे परवलीचे शब्द. आता ‘व्हॅलेंटाईन डे’ची धामधूम सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर लव्हशिपची हवा जोरात वाहू लागली आहे. प्रेमाची सप्तरंगी भावना व्यक्त करण्यासाठी तरुणाईचे काही ‘लव्हर्स स्पॉट’ ओळखले जातात. पण, या स्पॉटवर दक्षता म्हणून पोलिसांची गस्त असणार आहे. तसेच काही संघटनांकडून तरुणाईला विरोध होण्याचीही शक्यता आहे. 

अथांग समुद्राचा मिनी फिल देणार्‍या रंकाळा परिसरातील झाडीच्या गर्दीत व्हॅलेंटाईन साजरे करणार्‍यांची संख्या मोठी असते. शिवाजी विद्यापीठ परिसरातील राजाराम तलाव परिसर यासाठी हक्काचं ठिकाण आहे. महावीर गार्डन, कंदलगाव तलाव, पन्हाळा आदी ठिकाणे लव्हर्स स्पॉट मानली जातात. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्‍वभूमीवर या प्रत्येक स्पॉटवर पोलिसांची नजर असणार आहे. अनेक ठिकाणी प्रेमाच्या नावाखाली हिडीस प्रकार यापूर्वी घडले आहेत. जिल्ह्यातील अनेक लव्हर्स स्पॉट हे ‘मर्डर स्पॉट’ म्हणूनही ओळखले जातात.  शहरातील ठराविक कोल्ड्रिंक्स हाऊसमध्ये साहजिकच नेहमी वर्दळ दिसून येते. 

चित्रपट-मालिकांमुळे क्रेझ
चित्रपट व मालिका या बहुतेक काल्पनिक आणि मनोरंजनात्मक कथानकावर बेतलेल्या असतात. लोकांना आवडावे यासाठी यामध्ये नाट्य आणि कल्पनाविलास दाखवण्याचा प्रयत्न असतो. पण, अल्पवयीन मुला-मुलींना हा कल्पनाविलास उमगत नाही. ही मंडळी त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि फसतात. त्यांचे आयुष्य बरबाद होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे चित्रपट आणि मालिका हा व्यावसायिक आणि मनोरंजनाचा भाग आहे हे पालकांनी, शिक्षकांनी आणि ज्येष्ठांनी तरुणांना सागितले पाहिजे. अभिनेते किंवा अभिनेत्रींचे चाहते असावे, पण त्यांना ‘रोलमॉडेल’ बनवण्याचा प्रयत्न करणे या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत हे समजून घ्यायला हवे. 

तरुणांना मार्गदर्शनाची गरज
प्रेम ही तरल आणि सुंदर भावना आहे हे खरे आहे. पण, प्रेमाच्या नावाखाली छेडछाड, एकतर्फी प्रेम आणि तरुणींची नाहक बदनामी करण्याचे प्रकार वाढले आहेत. शाळा आणि कॉलेजचे वय हे खरे तर शिक्षण आणि करियरसाठी फोकस करण्यासाठी असते. कारण या वयातील जग जिंकण्याची उर्मी ही सामाजिक काम करण्यासाठी किंवा आई-वडिलांना अभिमान वाटेल असे काम करण्यासाठी वापरली पाहिजे. पण, अनेकजण वाट चुकतात. प्रेमाचा अर्थ चुकीचा समजून छेडछाडीच्या प्रकारात अडकतात. हा मार्ग गुन्हेगारीचा होऊ शकतो. आयुष्य कापरासारखे जळू शकते. त्यामुळे हे वय अल्लड असले तरी सामाजिक भान जपण्याची गरज आहे. यासाठी पालक, शिक्षक आणि ज्येष्ठांनी तरुणांना सातत्याने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.