Sun, Mar 24, 2019 12:25होमपेज › Kolhapur › ब्लॉग : तिचा भाऊ आला अन् 'खेळ' खल्लास

ब्लॉग : तिचा भाऊ आला अन् 'खेळ' खल्लास

Published On: Feb 14 2018 1:47PM | Last Updated: Feb 14 2018 1:47PMअनिरुद्ध संकपाळ : पुढारी ऑनलाईन

१४ फेब्रुवारी प्रेमाचा दिवस, आठवडाभर आधीपासूनच या दिवसाची चर्चा सुरु होते. प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत आहे. काय विशेष मग? कोण आहे का नाही? काय? कोण गर्लफ्रेंड नाही? इतकी वर्षे काय केलं? बघ त्याच्याकडे गर्ल फ्रेंड आहे, असे प्रश्न विचारून भांडावून सोडलं सगळ्यांनी. मग ठरवलं आज माझ्या प्रेमाबद्दल सांगायचं सगळ्यांना. 

हो मी सुद्धा प्रेमात होतो. अगदी १० वर्षांचा असल्यापासून. माझं प्रेम तुमच्यापेक्षा वेगळं होतं. (असं सगळ्यांनाच वाटत असतं) पण, माझं प्रेम खरचं वेगळ आहे. माझं प्रेम या १४ फेब्रुवारी या एका तारखेत बसणारं नाही. कारण माझं प्रेम ‘एकदिवसीय’ नाही ते ‘कसोटी’ सारखं आहे. कसोटी पाहणारं आहे. तुम्हाला अंदाज आलाच असेल मी कशाबद्दल बोलतोय ते होय मी बोलतोय ते माझ्या क्रिकेट प्रेमाबद्दल.

सामान्य प्रियकराला, प्रेयसीला विचाराल, ‘कधी प्रेमात पडलात?’ तर ते उत्तर देतील, ‘सांगता येत नाही कधी प्रेमात पडलो ते.’ तसचं आमचंही आहे या क्रिकेटच्या प्रेमात कधी पडलो ते सांगणं कठीण. कळतंय तसं बॅट आणि बॉल हातात आहेच. तुमचं कसं 'टिन एज' प्रेम असतं, तसं आमचं पाळण्यात असल्यापासूनच क्रिकेटवर प्रेम. 

जसं मोठं होत गेलो तसं हे प्रेम फुलत गेलं. मग रोजच या प्रेमाचा सराव करत गेलो. त्यात निपुण होत गेलो. हळूहळू या प्रेमाची सवयच लागली. झोपेतही या प्रेमाचा विचार दिवसभर याच प्रेमात आकंठ बुडालो. ना खाण्या पिण्याची शुद्ध ना वेळेचे भान. मग काय आमचा रोमान्स जोरात सुरू होता. या रोमान्सची चर्चा महाराष्ट्रभर सुरू होती सगळं कसं स्वप्नवत होतं.

जसं प्रत्येक प्रेम प्रकरणात होतं तसं आमच्याही प्रेमात झालं. तिच्या भावाला समजलं. मग काय आला एकेदिवशी आमच्या लव्हर्स स्पॉटवर (मैदानावर) आणि हाणलं जोरात मला. गुडघा तुटला (इन्जुरी) आठ दिवस पडून होतो. पण, एकच आस तिला परत कधी भेटतोय. रहावतंय कुठं गेलो तसाच पूर्ण बरा न होता. पण, आमच नशीब बेकार. परत तिचा भाऊ. झालेली जखम चिरडली त्यान. झालं मग काय या वेळी डायरेक्ट ऑपरेशन थेटरमध्ये रवानगी. शुद्ध आली तेव्हा कमरेपासून घोट्यापर्यंत पाय प्लास्टरमध्ये. 

पाय बघून मनात एकच विचार आता तिला भेटता येणार नाही. सहा महिने असाच कुबड्या घेवून काळ सरण्याची (डॉक्टरच्या परवानगीची) वाट पहात होतो. तिला भेटण्यासाठी तळमळत होतो. एक वर्ष गेलं शेवटी ती भेटली. पण, काहीतरी बदल झाला होता तिच्यात. पूर्वीसारखी नाही भेटली ती मला. भावाच्या भीतीने असेल कदाचित. पण, मी तिचा पाठलाग काही केल्या सोडला नाही. पण, एक वर्षाचा विरह, ताटातूट, भावाची भीती कहीही म्हणा पण मला हवी होती तशी ती भेटली नाही. 
या सगळ्यात आयुष्य पुढे सरकत गेलं. आता मी सुद्धा तिला भेटनं कमी केलंय. आता भेटतो कधीतरीच. अगदीच कशात जीव रमला नाही तर.

आता तुम्ही म्हणाल, प्रेम कमी झालं का तुझं तिच्यावरचं? अहो कसं होईल? आता आमच्या प्रेमाची भाषा बदलली इतकच. आता आम्ही दोघे मित्र आहोत चांगले आणि आयुष्यभर राहू मित्र म्हणून.