Tue, Jul 16, 2019 13:37होमपेज › Kolhapur › वडणगेतील महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

वडणगेतील महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 22 2018 1:23AMवडणगे : वार्ताहर

वडणगे (ता. करवीर) येथील सौ. विमल बाजीराव व्हरगे (वय 55) यांचा विजेचा धक्‍का बसून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही घटना घडली. व्हरगे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. दुपारी दोन वाजता नळाला पाणी आल्यानंतर त्या बांधकामाच्या ठिकाणी गेल्या होत्या. पाणी भरण्यासाठी त्यांनी घरगुती मोटार सुरू केली. मोटारला जोडलेल्या प्लास्टिक पाईपला तिढा पडल्याने पाईप मोटारच्या लोखंडी पाईपमधून निसटली. निघालेली पाईप गडबडीत मोटारला जोडत असताना त्यांना विजेचा जोरात धक्‍का बसला आणि त्या जागीच कोसळल्या. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुले असा परिवार आहे.

नवीन घराचे सुख अनुभवण्यापूर्वीच...

सौ. व्हरगे यांच्या नवीन घराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.  त्यांची दोन्ही मुले एमआयडीसीत खासगी कंपनीत नोकरी करतात. विमल घरकामासह गायी, म्हशींची कामे बघत, बांधकामाकडेही लक्ष द्यायच्या. दुपारी बांधकामासाठी पाणी भरत असताना त्यांना विजेचा धक्‍का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला. कष्टातून बांधलेल्या नवीन घराचे सुख अनुभवण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्‍त होत आहे.