Thu, Jul 18, 2019 12:49होमपेज › Kolhapur › गडहिंग्लज उपविभागात शिक्षण विभाग रामभरोसे!

गडहिंग्लज उपविभागात शिक्षण विभाग रामभरोसे!

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 05 2018 11:38PMगडहिंग्लज : प्रवीण आजगेकर

गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तिन्ही तालुक्यांत शिक्षण विभागाचा खेळखंडोबा सुरू आहे. ज्यांच्यावर या शिक्षण व्यवस्थेमध्ये तालुक्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे ती पदेच या तिन्ही तालुक्यांत रिक्‍त झाल्याने या विभागाच्या शिक्षणाला वाली कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. केवळ गटशिक्षण अधिकार्‍यांचीच नव्हे, तर विस्तार अधिकार्‍यांची पदेही अशाच पद्धतीने रिक्‍त आहेत.

गडहिंग्लज तालुक्यामध्ये गेल्या वर्षभरापूर्वी डॉ. जी. बी. कमळकर यांच्या रूपाने कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी मिळाले होते. त्यांच्या या ठिकाणच्या कामावेळी त्यांनाही दोन-तीन अतिरिक्‍त चार्ज दिले होते. त्यांच्याच कालावधीत तालुक्यातील अनेक शाळांमध्ये डिजिटल स्कूल या सह ज्ञानरचनावादाच्या शाळा सुरू झाल्या होत्या. या शाळांची पाहणी करण्यासाठी राज्यभरातून अनेक ठिकाणांहून शिक्षण क्षेत्रातील लोक येत होते. याशिवाय गडहिंग्लजला राज्यात पहिल्यांदा केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवून वेगळा आदर्श निर्माण केला होता.

गडहिंग्लजमधून त्यांची ऐन वेळी बदली करण्यात आली; मात्र त्यांच्या जागेवर पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी न देता हा कार्यभार आजरा येथील गटशिक्षणाधिकारी मोळे यांच्याकडे देण्यात आला. या दोन्ही तालुक्यांची जबाबदारी सांभाळताना त्यांनाही कसरत करावी लागली होती; मात्र त्यांची पदोन्‍नतीवर बदली झाल्याने पुन्हा गडहिंग्लज व आजरा या दोन्ही तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी पद रिक्‍तच राहिले आहे. ऐन परीक्षांच्या कालावधीत तसेच शिक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असणार्‍या या टप्प्यात या दोन्ही तालुक्यांतील महत्त्वाची पदे रिक्‍त राहिल्याने शिक्षण विभागाचे नुकसानच झाले आहे.

दुसरीकडे चंदगड तालुक्यामध्येही अशीच परिस्थिती असून या ठिकाणीही गटशिक्षणाधिकारी पदे रिक्‍त असल्याने या ठिकाणचा अतिरिक्‍त कार्यभार हा गडहिंग्लजमधील विस्तार अधिकार्‍यांकडे दिला आहे. मुळातच गडहिंग्लजला केवळ दोनच विस्तार अधिकारी सध्या कार्यरत आहेत. यापैकीही एक विस्तार अधिकारी चंदगडला प्रभारी म्हणून काम करत असून, दुसरे विस्तार अधिकारी नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाकडे प्रभारी अधिकारी म्हणून काम आहेत. म्हणजेच गडहिंग्लजला गटशिक्षणाधिकारी पद रिक्‍त व गडहिंग्लजच्या नावावर असलेले दोन्ही विस्तार अधिकारीही अन्यत्र काम करत असल्याने ही दोन्ही पदे रिक्‍त असल्याने शिक्षण विभागाला वाली कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज तालुका शिक्षणाच्या बाबतीत अग्र्रेसर ठरत असताना आता अधिकार्‍यांच्या कमतरतेमुळे या तालुक्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत चालला आहे. आजरा, चंदगड तालुकेही शैक्षणिकद‍ृष्ट्या प्रगतिपथावर आणण्याचे काम सुरू असताना या ठिकाणीही शिक्षण विभागातील पदेच रिक्‍त ठेवल्याने नेमके शिक्षण विभागाचे होणार तरी काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आगामी काळात शिक्षणाच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी या पदांचे अनन्यसाधारण महत्त्व असून, तिन्ही पंचायत समित्यांमधून याकरिता आवाज उठविण्याची गरज आहे.  

ते सदस्य कोण?

गडहिंग्लज तालुक्यातील गटशिक्षणाधिकार्‍यांचे पद रिक्‍त असल्याने पंचायत समितीकडून या ठिकाणी कागलचे गटशिक्षणाधिकारी डॉ. कमळकर यांना प्रभारी म्हणून आणण्यासाठी हालचाली सुरू आहेत. आजच्या पंचायत समितीच्या सभेत मात्र सदस्यांनी कमळकर यांना आणण्याला जिल्हा परिषदेच्या सदस्याने विरोध केला असून, कमळकर यांचे काम चांगले असूनही त्यांना विरोध करणारे सदस्य कोण, असा प्रश्‍नही विचारण्यात आला.