Wed, Feb 20, 2019 05:13होमपेज › Kolhapur › समाजसेवेच्या ध्येयामुळेच आयएएस होऊ शकलो

समाजसेवेच्या ध्येयामुळेच आयएएस होऊ शकलो

Published On: Apr 29 2018 11:14PM | Last Updated: Apr 29 2018 11:07PMपाटपन्हाळा : वार्ताहर

सामाजिक सेवेच्या उद्देशाने समाजाशी नवे नाते निर्माण करण्यासाठी स्पर्धा परीक्षांकडे वळलो आणि त्याच प्रेरणेने यश मिळाले, असे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (आयएएस) परीक्षेत देशात 631 क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अजय गणपती कुंभार (किसरूळ, ता. पन्हाळा) यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

अजय कुंभार यांचे मूळ जन्मगाव किसरूळ (ता. पन्हाळा) हे आहे. ग्रामीण भागात राहूनसद्धा त्यांनी भारतीय प्रशासन सेवेत उच्च अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले होते. अजय कुंभार यांचे वडील गणपती पांडुरंग कुंभार व आई शोभा गणपती कुंभार हे प्राथमिक शिक्षक आहेत. पाटपन्हाळा (ता. पन्हाळा) दुर्गम भागात शिक्षक म्हणून सेवा बजावताना त्यांनी शिक्षणाचे बाळकडू अजय यांना त्यांनी 
दिले.

त्यांचे प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर पाटपन्हाळा (ता. पन्हाळा) या शाळेत झाले. इयत्ता 4 थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक आला. माध्यमिक शिक्षण एस.एम. लोहिया हायस्कूल तसेच उच्च माध्यमिक शिक्षण स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे विज्ञान शाखेतून झाले. वालचंद कॉलेज सांगली येथे मेकॅनिकल पदवी पूर्ण केली.

त्यांनी दररोज 8 ते 10 तास अभ्यासात सातत्य ठेवून दोन वर्षे कसून आय.ए.एस. परीक्षेचा अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. त्या अपयशाला न खचता त्यांनी धैर्याने अभ्यासात सातत्य ठेवून दुसर्‍याच प्रयत्नात आय.ए.एस. परीक्षेत यशाला गवसणी घातली. अजय कुंभार यांची भारतीय प्रशासन सेवेतील निवड ही ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणादायी आहे. अवघ्या 24 व्या वर्षी ते लोकसेवा परीक्षेत पात्र ठरले. त्यांच्या या यशात आई, वडील, आजी, आजोबा, चुलते, लहान भाऊ अक्षय यांचा मोलाचा वाटा आहे.

अजय कुंभार यांचे दिल्‍लीहून  दत्त मंदिर फुलेवाडी, कोल्हापूर येथे आगमन होताच त्यांची जयभवानी कॉलनी निवासस्थानापर्यंत सवाद्य मिरवणूक काढून जल्‍लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांचे नातेवाईक फुलेवाडी परिसरातील नागरिक व सर्व प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिक्षक नेते राजाराम वरुटे, प्राथमिक शिक्षक बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बजरंग लगारे, संजय ठाणेकर, संजय लक्ष्मण पाटील, तानाजी घरपणकर, संदीप पाटील यांनी केले.