होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : चरणची काजल 'आयएफएस' परीक्षेत अकरावी

कोल्हापूर : चरणची काजल 'आयएफएस' परीक्षेत अकरावी

Published On: Feb 19 2018 10:07PM | Last Updated: Feb 19 2018 10:07PMकोल्हापूर : प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (आयएफएस) या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत चरण (ता. शाहूवाडी) येथील काजल अजित पाटील हिने देशात 11 वा क्रमांक प्राप्त करीत उज्ज्वल यश संपादन केले. मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील संदीप सुर्यवंशी याने 38 वा क्रमांक प्राप्त करून यश मिळविले.

काजलचे प्राथमिक शिक्षण चरण येथे झाले. माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, कागल येथे झाले. त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी येथून अ‍ॅग्रीकल्चरल इंजिनियरींगमधील बी. टेक. ही पदवी संपादन केली. पहिल्या प्रयत्नात तिने हे यश संपादन केले. गेली दोन वर्षे ती पुणे येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करीत आहे. तिचे आई-वडील प्राथमिक शिक्षक असून वडील जेऊर (ता. पन्हाळा ) येथे व आई नावली ( ता. पन्हाळा) येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 

मनपाडळे येथील संदीप सुर्यवंशीचे कुटुंबीय शेती करतात. त्याचे प्राथमिक शिक्षण वारणा येथे व माध्यमिक शिक्षण पाराशर हायस्कूल, पाराशर येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद महाविद्यालय (कोल्हापूर) येथे झाले. त्यानंतर पुणे येथून बीई (मेकॅनिकल) ही पदवी प्राप्त केली. दोन वर्षापूर्वी स्पर्धा परीक्षेद्वारे यश मिळवून तो इंडो तिबेटीयन बॉर्डर फोर्समध्ये असिस्टंट कमांडट पदावर कार्यरत होता. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पदाचा राजीनामा देत त्याने गेले कांही दिवस कोल्हापुरातील प्री आय. ए. एस. ट्रेनिंग सेंटरमध्ये अभ्यास सुरु केला होता.