कोल्हापूर : प्रिया सरीकर
सोशल मीडियाचा आपल्या जीवनातील सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. जे सोशल मीडियाद्वारे आपल्या नजरेच्या टप्प्यात येते त्याचा शोध आपण घेत असतो. असेच आता गणेशमूर्तींच्या बाबतही घडू लागले आहे. संकष्टी चतुर्थी असो वा गणेश चतुर्थी... त्यानिमित्ताने सोशल मीडियावर फिरणार्या देखण्या बालगणेशाच्या छबी आपल्या सर्वांनाच भावतात. साहजिकच, आपण गणेश चतुर्थीला असेच बाप्पा आपल्या घरी आणण्याची इच्छा मनोमन बाळगतो; पण आता ही इच्छा पूर्णत्वास येणार आहे. कारण, सोशल मीडियावर फिरणार्या ‘अँटिक बालगणेशा’ आपल्या कुंभारवाड्यांत आकाराला आला आहे. मूर्तिकार काशीनाथ शंकर माजगावकर यांनी गणेशाची अशी दहा विविध आकर्षक रूपे साकारली आहेत.
घरगुती गणेशमूर्तींमध्ये सिंहासनावर विराजमान झालेल्या पारंपरिक मूर्तीशिवाय अनेक रूपे गेल्या काही वर्षांत साकारली जात होती. यामध्ये बालगणेशही होते; पण जास्वंदीच्या फुलातील आणि बालकृष्णाच्या रूपातील बालगणेश अशा काही मोजक्याच रूपात बाप्पा दिसायचे. सोशल मीडियावर मात्र गेल्या चार-पाच वर्षांत बालगणेशाची अनेक अँटिक रूपे पाहायला मिळत होती. हे फोटो पाहूनच काशीनाथ शंकर माजगावकर यांनी मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. पहिल्या वर्षी केवळ दोनच मॉडेल त्यांनी साकारली. त्याला मिळणारी पसंती पाहून गेल्या चार वर्षांत दहा विविध रूपांतील बालगणेश त्यांनी साकारले. स्थानिक मूर्तिकारांकडेही त्यांनी साकारलेली ही रूपे वितरित होत असल्याने यावर्षी शहरातील विविधरूपी गणेशमूर्तींमध्ये बालगणेशाची ही रूपे असणार आहेत. दरवर्षी बालगणेशाच्या या रूपांना अधिक पसंती लाभत असल्याने त्यामध्ये नावीन्य देण्याचा प्रयत्न असल्याचे माजगावकर यांनी सांगितले. मूर्ती रंगकामातून अधिक उठावदार करण्याची जबाबदारी त्यांचा मुलगा संदीप व भाचा ओंकार यांनी घेतली.
हत्तीवरील बालगणेश, नंदीवरील बालगणेश, रथातील गणेश, केळीच्या पानावर बसून मिष्ठान्न खाणारा बालगणेश, उंदराला मांडीवर घेऊन त्याला मोदक खाऊ घालणारा गणेश, मंदिरातील घंटीवर बसलेला बालगणेश, उंदरांसोबत खेळणारा बालगणेश, तिरकस बसलेला बालगणेश अशा विविध रूपांत बाप्पा साकारले आहेत.