Wed, Sep 19, 2018 22:09होमपेज › Kolhapur › शिवाजी विद्यापीठात होणार ‘अंडरग्राऊंड सब-वे’

शिवाजी विद्यापीठात होणार ‘अंडरग्राऊंड सब-वे’

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 10:53PMकोल्हापूर : प्रवीण मस्के

शिवाजी विद्यापीठातील बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय ते शिक्षणशास्त्र अधिविभागापर्यंतचा 500 मीटर लांबीचा अंडरग्राऊंड सब-वे उभारण्यात येणार आहे. यामुळे मुख्य प्रवेशाद्वारासमोरच्या हायवेवरील रस्ता ओलांडताना होणारे अपघात टळणार आहेत.

विद्यापीठाचा सुमारे 850 एकरांचा विस्तीर्ण परिसर आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर कार्यक्षेत्र असल्याने दररोज कामानिमित्त येणार्‍या विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्राचार्य यांच्यासह कर्मचार्‍यांची संख्या जास्त आहे. विद्यापीठ मुख्य प्रवेशाद्वाराजवळील जुना पुणे-बेंगलोर हायवेच्या पलीकडे तंत्रज्ञान अधिविभाग, नॅनो टेक्नॉलॉजी विभाग, राजर्षी शाहू संशोधन केंद्र यासह अनेक विभाग आहेत. यात शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी रोज जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडतात. यापूर्वी हायवेवर अनेकवेळा अपघात झाले आहेत. हायवेवरील रस्ता ओलांडताना मोठा अपघात होऊ नये आणि विद्यार्थी, पालक व कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी विद्यापीठ प्रशासनाने तातडीने पाऊल उचलले आहे. फ्लाय ओव्हर बांधण्याबाबत यापूर्वी नियोजन झाले होते; ते काही तांत्रिक अडचणींमुळे शक्य झाले नाही. त्यानंतर बॅ. खर्डेकर ग्रंथालय ते शिक्षणशास्त्र अधिविभाग असा अंडरग्राऊंड सब-वे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी कन्सलटंन्सी नेमण्यात आली आहे. सर्व्हेंर्गत जागा निश्‍चित झाली असून, सब-वे बांधण्यासंदर्भातील माती परीक्षण अहवाल आला आहे. सब-वेचे डिझाईनही तयार झाले आहे.