Fri, May 24, 2019 20:32होमपेज › Kolhapur › उदगाव रेल्वे पुलाला अवजड वाहनाची धडक

उदगाव रेल्वे पुलाला अवजड वाहनाची धडक

Published On: Mar 04 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 12:28AMजयसिंगपूर : प्रतिनिधी

सांगली-कोल्हापूर मार्गावरील उदगाव-अंकली रेल्वे पुलाला संरक्षित हाईटगेज पाडून भरधाव अवजड वाहनाने मध्यरात्री धडक दिली. मध्यभागी दिलेल्या जोरदार धडकेने या पुलाचा सुमारे दीड फूट लोखंडी भाग सरकला. परिणामी, दोन रूळांच्या अंतरातही फरक पडला. रेल्वे संरक्षक कठड्यालाही धोका निर्माण झाला.

पहाटे 4.10 वाजता जाणार्‍या मालगाडीच्या चालकाला दोन रूळांच्या अंतरात फरक झाल्याचे लक्षात आले. त्याने तत्काळ आपत्कालीन ब्रेक दाबून मालगाडी थांबवली. कृष्णा नदीवर असलेल्या गेटमनला हा प्रकार दाखवला. दोघांनी मिरज जंक्शनशी संपर्क साधला. पहाटे तत्काळ वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

पाहणीत अवजड वाहनाने पुलाला जोरदार धडक दिल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अभियंते, कर्मचारी पाचारण करून युद्धपातळीवर चार मोठ्या क्रेन व दोन जेसीबीच्या मदतीने पहाटे पाच वाजता सरकलेला पूल दुरुस्त केला. त्यानंतर सकाळी सात वाजता धिम्या गतीने या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. आता दोन दिवस चाचणी घेण्यात येणार आहे.

सांगली-कोल्हापूर रेल्वे वाहतूक बंद

दरम्यान, घटनेनंतर रेल्वे विभागाने सांगली-कोल्हापूर मार्गावरील जयसिंगपूरकडील वाहतूक बंद केली. उदगाव-चिंचवाडमार्गे मिरज व सांगलीला, तर तमदलगे खिंड जैनापूरमार्गे व जयसिंगपूर शहरातून क्रांती चौकातून स्टेशन रोडने बायपास अशी वाहतूक वळविली. त्यामुळे या मार्गावर व मुख्य जैनापूर बायपास ते अंकली टोलनाका ते सांगलीपर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. दुपारी दोनपर्यंत वाहनधारकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. रेल्वे कर्मचार्‍यांनी यापूर्वी वाहनांच्या धडकेत पडलेले मोठे लोखंडी हाईटगेज सांगली व जयसिंगपूर दिशेला टाकून मार्ग बंद केला होता. 

उदगावपर्यंत आलेली वाहने उदगाव ते रेल्वे स्टेशनमार्गे वळविण्यात आली. पाच ते सहा तास वाहनांच्या दोन्ही बाजूला रांगा लागल्या होत्या.

पुलाला जोरदार धडक

अज्ञात अवजड वाहन सांगली दिशेकडून आले. मध्यरात्री भरधाव वाहनाने पुलाच्या उत्तर दिशेकडील हाईटगेजला धडक देऊन ते पाडले.त्यानंतर पुलाला धडक दिली. या धडकेत पुलाचा मध्यभागी असलेला लोखंडी आडवा पिलर चेपला.संरक्षक कठडा सरकला. धडकेत रेल्वे मार्गावरील खडी पुलाखाली पडली. रूळ सरकल्याने मालगाडीच्या चालकाला मालगाडी घसरत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने जागेवरच आपत्कालीन ब्रेक लावून गाडी थांबविली. दुपारी दोन वाजेपर्यंत  दुरुस्तीचे काम सुरू होते.

वाहतूक विस्कळीत

रेल्वे पुलाखालील वाहतूक बंद केल्याने या घटनेचा सगळा ताण आज जयसिंगपूर शहर व जैनापूर बायपास मार्गावर पडला. जयसिंगपूर पोलिस, मिरज, कोल्हापूर रेल्वे पोलिस, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती नसल्याने शिरोळ, जयसिंगपूर मार्गाकडून आलेली अनेक अवजड वाहने, मोटारसायकलस्वार यांना उदगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंपापासून मागे परतावे लागले. या ठिकाणी बॅरिकेट्स लावून महामार्ग बंद करण्यात आला होता. उदगावमधून रेल्वे स्टेशनमार्गावरून बायपासला वाहतूक वळविण्यात आली. त्यामुळे जयसिंगपूर रेल्वेस्टेशनपर्यंतचा मार्ग आणि त्यापुढील रेल्वे गेट पार करेपर्यंत वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. तसेच जैनापूरमार्गे सांगलीकडे जाणारी वाहने यामुळे दानोळी, उमळवाड, कोथळी, कुंभोजकडून जयसिंगपूरला येणार्‍या वाहनांना याचा त्रास सोसावा लागला. जयसिंगपूरचे सहायक पोलिस निरीक्षक डी. बी. कदम व पोलिस कर्मचारी, रेल्वेचे पोलिस अधिकारी अमरिश बोहराव, कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात होते.

जुजबी हाईटगेजमुळेच रेल्वे पुलाला धडकले वाहन

रेल्वे पुलाला धोका पोहोचू नये, यासाठी या पुलाच्या सांगली व उदगाव दिशेला भक्कम स्वरूपाचे इंग्रजांच्या काळातील हाईटगेज होते. मात्र, गेल्या दोन-अडीच वर्षांत वाहनांच्या धडकेत हे भक्कम असणारे हाईटगेज पडले. त्यानंतर रेल्वे खात्याने सांगलीच्या दिशेला अलीकडे भक्कम गर्डर स्वरूपातील हाईटगेजऐवजी गोल आकारातील फोन डांबाच्या स्वरूपातील जुजबी हाईटगेज बसविले आहेत. त्यामुळे भरधाव वाहनांच्या धडकेत हाईटगेज कोसळतात. त्याच स्वरूपातील हाईटगेजमुळे अज्ञात अवजड वाहनाची धडक बसली असावी. विशेष म्हणजे धडकेनंतर या वाहन चालकाने रिव्हर्स घेऊन पोबारा केला आहे. मालगाडीच्या चालकाच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला, हे मात्र नाकारता येत नाही.

दोन दिवस ट्रायल

अज्ञात वाहनाने पुलाच्या मध्यभागी जोरदार धडक दिली आहे.जोरदार धडकेने पुलाचा लोखंडी सांगाडा व रूळ सरकले. युद्धपातळीवर पहाटे कर्मचारी तैनात करून रूळातील दोन अंतर समांतर करण्यात आल्यानंतर मिरज व कोल्हापूर येथे थांबवलेल्या गाड्या सोडण्यात आल्या. सातच्या सुमारास पहिली गाडी गेली. मात्र, या पुलावरील वाहतूक चार दिवस धिम्या गतीने करण्यात येणार आहे.दोन दिवस ट्रायल घेऊनच या पुलाच्या सुरक्षिततेबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे खात्याकडून समजते.