Sat, Aug 24, 2019 21:58होमपेज › Kolhapur › तरुणांच्या दोन गटांत हाणामारी

तरुणांच्या दोन गटांत हाणामारी

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 19 2018 1:37AMकोल्हापूर : प्रतिनिधी 
पूर्ववैमनस्यातून मध्यवर्ती बसस्थानक परिसरात तरुणांचे दोन गट एकमेकास भिडले. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. तरुणांना अटकाव करणार्‍या विजय जाधव या होमगार्डला काही तरुणांनी मारहाण केली. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी येत लाठीमार करून जमाव पांगवला. संबंधित तरुण  यादवनगर परिसरातील असल्याची चर्चा  सुरू होती. 
यादवनगरातील तरुणांच्या दोन गटांत गेले काही दिवस वाद धुमसत आहे. यातील काहीजण गुरुवारी रात्री मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आले होते. याचवेळी विरोधी गटातील दोन तरुण तेथे आले. या तरुणांच्या गटात अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला. याची माहिती मिळताच यादवनगरातील मोठा जमाव बसस्थानक जवळील रिक्षाथांब्यासमोर जमला. हे तरुण एकमेकांच्या अंगावर गेले. येथे बंदोबस्ताला असणारे काही होमगार्ड भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र जमावातील काही हुल्लडबाज तरुण शिवीगाळ करीत या होमगार्डला दमदाटी करू लागले. 
होमगार्ड विजय जाधव याला तीन ते चार तरुणांनी रिक्षा थांब्याजवळून  ओढत नेऊन अंधारात मारहाण केली. काही मिनिटात सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे आणि सहकारी घटनास्थळी आले. त्यांनी लाठीमार करून जमाव पांगवला. तसेच विजय जाधवची सुटका केली. 
सीसीटीव्हीद्वारे शोध सुरू
मारामारी करणारे तरुण यादवनगरातील असल्याची प्राथमिक माहितीनुसार मध्यवर्ती बसस्थानक, महालक्ष्मी चेंबर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे या तरुणांचा शोध सुरु करण्यात आला आहे. 
अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
मारहाण झालेल्या विजय जाधव याला शाहूपुरी पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. तसेच एका पोलिसालाही धक्काबुक्की करण्यात आली. या दोघांचे जबाब नोंदवून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत  सुरू होते. 
वाद नेहमीचाच
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रात्री उशिरापर्यंत तरुणांचे घोळके थांबून असतात. काही मद्यपींचेही हे नियमित ठिकाण बनले आहे. रात्री-अपरात्री मध्यवर्ती बसस्थानकात उतरणार्‍या प्रवाशांनाही याचा त्रास होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. अशा हुल्लडबाजांचा बंदोबस्त करण्याची मागणी खाद्यपदार्थ विक्रेते, रिक्षा चालकांकडून व्यक्त करण्यात आली.