Wed, Mar 20, 2019 12:46होमपेज › Kolhapur › दोघा सराईत चोरट्यांना अटक

दोघा सराईत चोरट्यांना अटक

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 11:56PMकोल्हापूर : प्रतिनिधी

शहरासह ग्रामीण भागात घरफोडी करून कोल्हापूर पोलिसांना आव्हान देणार्‍या सांगली जिल्ह्यातील सचिन श्रीकांत हिंगणे (वय 28, रा. बांबवडे, ता. शिराळा) व हर्षद हिंदुराव जाधव (22, वाटेगाव, ता. वाळवा) या  सराईतांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले.  चौकशीत संशयितानी आठ गुन्ह्यांची कबुली दिली. 6 दुचाकी, कॉस्मेटिक मटेरियल, एलईडी टीव्ही असा सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी या दोघांना 24 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. सराईतानी कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली व सातारा जिल्ह्यांतही गुन्हे केल्याचा संशय करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी व्यक्‍त केला.

चोरट्यानी नागाव येथील सुरेश नागावकर यांचे कॉस्मेटिक मटेरियलचे गोदाम फोडून 7 लाखांचे साहित्य चोरल्याची कबुली दिली आहे. शिवाय शहर, ग्रामीण भागातून सहा दुचाकी, वेगवेगळ्या कंपनीच्या एलईडी टीव्हीही हस्तगत केल्या आहेत, असेही गुरव यांनी सांगितले. चोरट्यांनी नागावकर यांच्या गोदामातून मटेरियलसह दुचाकीही चोरल्याचे उघड झाले आहे.

हिंगणे, जाधवसह आणखी काही सराईतांचा गुन्ह्यात समावेश असावा, असा संशय आहे. या टोळीने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातून सात म्हशींची चोरी करून त्याची सांगोला येथील बाजारपेठेत विक्री केल्याची माहितीही उघड झाली आहे.