Fri, Apr 26, 2019 09:21होमपेज › Kolhapur › कोठडीतून पळालेले दोघे जेरबंद

कोठडीतून पळालेले दोघे जेरबंद

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 20 2018 1:40AMपेठ वडगाव : वार्ताहर

पोलिस कोठडीतून पलायन केलेल्या सूरज्या-गोंद्या टोळीतील विराज गणेश कारंडे (वय 19, दरवेश पाडळी, ता. हातकणंगले) व ओंकार महेश सूर्यवंशी (19, रा. कासेगाव ता. वाळवा) या दोघांच्या वडगाव पोलिस ठाण्याच्या विशेष पथकांनी मोटारसायकलवरून थरारक पाठलाग करून मुसक्या आवळल्या. मात्र, टोळीचा म्होरक्या सूरज्या ऊर्फ सूरज सर्जेराव दबडे (22, रा. वाठार, ता. हातकणंगले) व गोविंद ऊर्फ गोंद्या वसंत माळी हे दोघे फरार झाले आहेत.  

शाहूवाडी पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यांच्या चौकशीसाठी मोका कारवाई झालेल्या सूरज्या-गोंद्या टोळीतील चार अट्टल गुन्हेगारांनी कोठडीचे ग्रील वाकवून पलायन केले होते. या आरोपींना पकडण्यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांनी सर्व पोलिस ठाण्यांना हायअ‍ॅलर्ट दिला होता.

कारंडे व सूर्यवंशी यांनी पहाटे पोलिस ठाण्यातून पलायन केल्यानंतर एका वाहनातून वारणा-कोडोलीपर्यंत प्रवास केला. त्यानंतर ते वारणा कारखान्याच्या परिसरातील एक मोटारसायकल चोरून तांदूळवाडीकडे रवाना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.       

थरारक पाठलाग
पलायन केलेले खतरनाक गुन्हेगार तांदूळवाडी येथे आल्याची माहिती वडगाव पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांना खबर्‍याकडून मिळाली. त्यानुसार वडगाव पोलिसांची दोन पथके तांदूळवाडी व किणी टोल नाका येथे दबा धरून बसली. तांदूळवाडी ते कोल्हापूरच्या दिशेने मोटारसायकलवरून भरधाव वेगाने जात असलेल्या संशयित आरोपींची त्यांनी खात्री केली. पथकातील पोलिस नाईक बालाजी घोळवे, दादा माने, संदीप गायकवाड, विकास माने यांनी थरारक पाठलाग सुरू केला. पोलिस पाठलाग करीत असल्याचे पाहून त्यांनी आपल्या गाडीचा वेग आणखी वाढवला. पथकातील पोलिसांनी तितक्याच वेगाने पाठलाग केला. सहायक पोलिस निरीक्षक गजानन देशमुख, फौजदार मलगुंडे, पोलिस नाईक बाबासाहेब दुकाने, विकास गस्ते यांनी झडप टाकून दोघांना जेरबंद केले. त्यांची नावे पलायन केलेल्या गुन्हेगारांतील विराज कारंडे आणि ओंकार सूर्यवंशी अशी असल्याचे स्पष्ट झाले.

या कारवाईनंतर शाहूवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी वडगाव पोलिस ठाण्यास भेट देऊन पोलिसांचे कौतुक केले.