Sun, Jul 21, 2019 08:18होमपेज › Kolhapur › कंदलगाव, शिंगणापूरजवळ बुडून वृद्धासह दोघांचा मृत्यू

कंदलगाव, शिंगणापूरजवळ बुडून वृद्धासह दोघांचा मृत्यू

Published On: Apr 16 2018 1:12AM | Last Updated: Apr 16 2018 1:11AMकोल्हापूर /कंदलगाव : वार्ताहर

कंदलगाव येथील तलावात बुडून राजेंद्रनगरमधील आकाश ऊर्फ नीलेश पांडुरंग चंदनशिवे (वय 22) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. तसेच शिंगणापूर येथे नदीत पोहताना चक्‍कर आल्याने इंद्रजित ऊर्फ विनायक राधाकृष्ण बागल (वय 50, रा. सांगली) पाण्यात बुडाले. 

आकाश दोन मित्रांसोबत रविवारची सुट्टी असल्याने कंदलगावला फिरायला आला होता. तिघे जण दुपारी अडीच वाजता पोहण्यासाठी तलावात उतरले. तिघानांही पक्के पोहता येत नसल्याने काठावर बसून होते. मात्र, आकाश तलावात पोहत असताना  बुडत असल्याचे मित्रांच्या लक्षात आले. त्यांनी शर्ट काढून त्याच्या दिशेने  फेकला. मात्र, त्यात यश आले नाही. मित्रांनी राजारामपुरी पोलिसांशी संपर्क साधून फायर स्टेशन व गोकुळ शिरगाव पोलिसांना माहिती दिली. गंगावेस येथील उदय निंबाळकर यांनी मृतदेह बाहेर काढला.

आकाशच्या भावाचाही अपघातामध्ये मृत्यू झाल्याने तीन बहिणीमध्ये आकाश एकटाच होता. तो गवंडी काम करायचा. आकाशचा मृतदेह पाहून बहिणींनी हंबरडा फोडला. कंदलगाव तलावातील सात वर्षांतील ही तिसरी घटना असून, या आधी दोन कॉलेज तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गावातील तरुणांकडून वारंवार याची माहिती इथे येणार्‍या तरुणांना सांगूनही हुल्‍लडबाजी करणारे तरुण ऐकत नव्हते. आकाशच्या पश्‍चात आई व तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

दरम्यान, शिंगणापूर येथे नदी पात्रात पोहताना चक्‍कर आल्याने इंद्रजित ऊर्फ विनायक राधाकृष्ण बागल (वय 50, रा. सांगली) पाण्यात बुडाले. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. काठावरील लोकांनी त्यांना बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले असता, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.