दोन परप्रांतीयांचे क्वारंटाईनमधून पलायन

Last Updated: Apr 07 2020 1:10AM
Responsive image


पेठवडगाव : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या संचारबंदीचे उल्लंघन केलेल्या सुमारे 74 प्रवाशांना येथील आदर्श शिक्षण समूहाच्या इमारतीमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी पहाटे यातील सूरज बिटू व्हीलतारा व विष्णू बिनू व्ही. व्ही. (रा. दोघेही केरळ) यांनी पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

संचारबंदी लागू असल्याने राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणार्‍या स्थलांतरित नागरिकांना जयसिंगपूर विभागीय पोलिस उपअधीक्षक शरद काळे यांनी किणी टोल नाक्यावर ताब्यात घेतले होते. सर्वांना वाठार येथील अशोकराव माने मेडिकल कॉलेज व आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये क्वारंटाईन  करण्यात आले आहे.

स्थलांतरित 74 नागरिक येथील आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये होते. यामध्ये बहुतांशी  क्वारंटाईन दक्षिण भारतीय आहेत.  सर्वांना दररोज चहा, नाश्ता, जेवण अशा सुविधा पुरविण्यात येत आहेत.

हमें यहाँ से छोड दो...

रविवारी सुमारे पन्नासभर क्वारंटाईन नागरिकांनी हमें यहाँ से छोड दो, नहीं तो हम खाना छोड देंगे, अशी भूमिका घेतली. प्रशासनाने रविवारी रात्री जेवण दिले. मात्र, त्यांनी जेवण केले नाही. मंडल अधिकारी गणेश बर्गे यांनी नागरिकांची समजूत   काढल्यानंतर सोमवारी सर्वांनी चहा, नाश्ता, जेवण घेतले.

गणतीनंतर पलायनाचा प्रकार

दररोज सकाळी व रात्री क्वारंटाईन नागरिकांची येथील प्रशासकीय यंत्रणेकडून गणती केली  जाते. सोमवारी सकाळी गणतीमध्ये दोघेजण कमी आढळून आले. सूरज  व्हीलतारा व विष्णू बिनू हे दोघे पसार झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे येथील प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पलायन केलेल्या दोघांचा शोध घेतला. मात्र, त्यांना पकडण्यात अपयश आले आहे.

उंटावरून शेळ्या हाकण्याच्या प्रकार

या विलगीकरण कक्षासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या एका प्रमुख अधिकार्‍याचा अजब प्रकार यानिमित्ताने उजेडात आला. या अधिकार्‍याला प्रवाशांची जेवण व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी उपस्थित राहण्याचा आदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे हातकणंगले तालुकाप्रमुख तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी दिला आहे. मात्र, हा अधिकारी हाताखालच्या कर्मचार्‍यांना आदेश देऊन उंटावरून शेळ्या हाकण्याच्या प्रकार करीत असल्याची चर्चा  घटनास्थळी दबक्या आवाजात सुरू होती.

अधिकारी चिंतेत

येथील आदर्श गुरुकुल समूहाच्या इमारतीमधील इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमधील दोनजण पळून गेल्याने जबाबदार अधिकार्‍याची पाचावर धारण बसली आहे.