Fri, Jul 19, 2019 18:33होमपेज › Kolhapur › पंचगंगा पुरात दोन तरुण वाहून गेले!

पंचगंगा पुरात दोन तरुण वाहून गेले!

Published On: Jul 16 2018 1:24AM | Last Updated: Jul 16 2018 12:26AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगेला आलेल्या पुरात रविवारी दोन तरुण वाहून गेले. अभियंता तरुणाने पोहण्यासाठी जुन्या शिवाजी पुलावरून उडी टाकली. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो वाहून गेला. तर पंचवीस वर्षीय अनोळखी तरुणाने दुपारी नदीत उडी टाकली. या तरुणाचा सायंकाळपर्यंत शोध घेण्यात आला. मात्र, छडा लागला नाही. पावसामुळे सायंकाळी शोधमोहीम थांबविण्यात आली. एकाच दिवशी घडलेल्या दोन घटनांमुळे शिवाजी पूल परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. परिणामी, मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

सत्यजित शिवाजी निकम (वय 21, रा. शाहूगल्ली, तोरस्कर चौक) असे अभियंता तरुणाचे नाव आहे. सत्यजितने अभियांत्रिकी शिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. एकुलता एक मुलगा नदीत वाहून गेल्याची माहिती समजताच आई, वडिलांसह नातेवाईकांना मोठा मानसिक धक्‍का बसला. आईने फोडलेल्या हंबरड्यामुळे सार्‍यांची मने हेलावली. शाहू गल्लीतील घरासमोर नातेवाईकांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

महापालिका अग्‍निशमन, आपत्कालीन पथक, जीवन ज्योतीच्या स्वयंसेवकांनी दोन बोटींमधून सत्यजितचा शोध घेतला. अंधार, मुसळधार पावसामुळे शोधमोहिमेत अडथळे येत होते. अखेर सायंकाळनंतर शोध थांबविण्यात आला. सोमवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार आहे.

दुसर्‍या एका घटनेत रविवारी दुपारी बाराच्या सुमाराला अनोळखी तरुण जुन्या शिवाजी पुलावरून पळत आला. पुलाच्या संरक्षक कठड्यावरून त्याने पुरात उडी टाकली. नागरिकांनी आरडाओरड करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, शंभर मीटर अंतरावर पाण्याच्या मुख्य प्रवाहात तो क्षणार्धात दिसेनासा झाला. रात्री उशिरापर्यंत तरुणाच्या नावासह त्याचा ठावठिकाणा पोलिसांना लागला नव्हता. आत्महत्येच्या उद्देशाने अनोळखी तरुणाने नदीत उडी टाकली असावी, असा संशय करवीरचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी व्यक्‍त केला.

पंचगंगा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या दोनही तरुणांच्या शोधासाठी अग्‍निशमन दलाचे मनीष रणभिसे, मधुकर जाधव, प्रमोद मोरे, ओंकार कारंडे, हणमंत कुलकर्णी, हवालदार एस. एन. सावेकर, एस. के. राऊत, जालिंदर पाटील यांनी कसबा बावड्यातील राजाराम तलावापर्यंत बोटीतून शोध घेतला. मात्र, त्यांचा सुगावा लागला नाही.

पंचगंगेच्या महापुरात दोन तरुण शिवाजी पुलाजवळून वाहून गेल्याची बातमी वार्‍यासारखी पसरताच नातेवाईक, तोरस्कर चौकातील नागरिक, महिलांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पुलावरील प्रचंड गर्दीमुळे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येत होत्या.

पोलिस ओरडत असतानाच सत्यजितने पुरात उडी टाकली

मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने जुन्या पुलासह नदीकाठावर जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. करवीर, लक्ष्मीपुरीसह शहर वाहतूक नियंत्रण शाखेचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुलावरून उड्या टाकून पोहण्यासाठी सत्यजित चार साथीदारांसमवेत दुपारी पुलावर आला होता. मात्र, पोलिसांनी त्याच्यासह मित्रांना पिटाळून लावले होते. पुन्हा साडेचार वाजता पिकनिक पॉईंटच्या दिशेने गेला. तेथूनही त्याला पोलिसांनी परत पाठविले. नंतर पोलिसांची नजर चुकवून त्याने जुना पूल गाठला. वाहतूक शाखेचे पोलिस त्याच्यावर ओरडत असतानाच सत्यजितने नदीपात्रात उडी टाकली.

भोवर्‍यात सापडला अन् दिसेनासा झाला

सत्यजितसह तोरस्कर चौकातील त्याचे साथीदार पट्टीचे पोहणारे आहेत.दरवर्षी पुरात पोहण्याचा त्याचा अनुभव आहे. गेल्या वर्षीही सत्यजितने जुन्या पुलावरून पुरात उड्या टाकून पोहण्याचा आनंद घेतला होता. यंदाही त्याच्या साथीदारांनी पुरात उड्या टाकण्याचा बेत केला होता. दोन दिवसांपासून धडपड सुरू होती; पण पोलिसांनी मज्जाव केल्याने त्याचा बेत फसला होता. अखेर पोलिसांची नजर चुकवून सत्यजितने पुरात उडी टाकलीच.

साथीदार सुदैवाने बचावले!

सत्यजितसह साथीदार उमेश निकम, अभिषेक निकम, ओंकार जाधव, अनिकेत शिंदे दुपारी सोबत होते. सत्यजितने पुरात उडी टाकल्यानंतर पुलापासून काही अंतरावरील भोवर्‍यात सापडल्याचे निदर्शनास आले. धोक्याची शक्यता दिसताच उमेश, अभिषेक, ओंकार यांनी नदीत उड्या टाकून सत्यजितला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. पाण्याच्या प्रवाहामुळे साथीदारही काही काळ हतबल झाले. तातडीने सर्वांनी नदीकाठ गाठला. त्यांचे सर्वांग थरथरत होते. गर्भगळीत झालेले साथीदार केवळ सुदैवाने बचावले.