होमपेज › Kolhapur › चांदोली जलाशयात दोघे बुडाले

चांदोली जलाशयात दोघे बुडाले

Published On: May 14 2018 1:41AM | Last Updated: May 14 2018 12:39AMमलकापूर : वार्ताहर

शाहूवाडी तालुक्यातील चांदोली लघुप्रकल्पाच्या जलाशयात बोट उलटून दोघेजण बुडाले, तर एकास वाचवण्यास यश आले. गोपाळ दीपक पाटील (वय 21, रा चांदोली, ता. शाहूवाडी) व शुभम विजय पाटील (14, रा मणेरमळा, उचगाव, ता. करवीर) अशी बुडालेल्या दोघांची नावे आहेत, तर सुमित अमित पाटील (12, रा कदमवाडी, कोल्हापूर) याला गोपाळचा भाऊ विजयने पोहत जाऊन वाचवले. रात्री उशिरा शाहूवाडी पोलिसांत याची नोंद झाली.

उन्हाळी सुट्टी असल्याने रविवारी चांदोली धरणाच्या जलाशयात  पोहण्यास जाऊ या, असा आग्रह गोपाळने शुभम व त्याचा मावसभाऊ सुमितकडे धरला. सायंकाळी पाचच्या सुमारास गोपाळ, शुभम, सुमित व विजय धरणावर आले. अंघोळीपूर्वी त्यांनी शेजारी असणार्‍या पुण्यातील देशपांडे यांच्या  प्लँटिंगमध्ये नादुरुस्त बोट पाहिली. ती बोट घेऊन गोपाळ, शुभम व सुमित बोटीत बसून जलाशयात बोटिंग करू लागले.  मध्यावर येताच बोट उलटली.  तिघेही पाण्यात उडून पडले. काठावर बसलेल्या सुमितला बोटीचा आधार मिळाला. दरम्यान जलाशयाबाहेर उभा असलेला गोपाळचा भाऊ विजयने पोहत जाऊन सुमितला वाचवले; परंतु गोपाळ व शुभम दोघेही जलाशयात बुडाले. विजयने आरडाओरडा सुरू केल्याने परिसरातील ग्रामस्थ आले. सरपंच नामदेव पाटील यांनी पोहणार्‍या तरुणाच्या सहकार्याने शोधमोहीम राबवली. 

शाहूवाडी पोलिसही घटनास्थळी वेळाने आले. आपत्कालीन यंत्रणेची प्रतीक्षा करत ग्रामस्थ घटनास्थळी आले. शुभम व त्याचा मावस भाऊ सुमित आजी धोंडुबाई कुंभार यांच्याकडे तीन दिवसांपूर्वी आजोळी सुट्टीसाठी आले होते. घटनास्थळी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर व पं. स. सदस्य अमरसिंह खोत यांनी भेट दिली.