Wed, Apr 01, 2020 22:48होमपेज › Kolhapur › दूध भेसळ रोखण्यासाठी देशभर २८ हजार प्रयोगशाळा

दूध भेसळ रोखण्यासाठी देशभर २८ हजार प्रयोगशाळा

Last Updated: Feb 22 2020 2:15AM
कोल्हापूर : चंद्रशेखर माताडे

देशभर दुधाचे उत्पादन वाढत असतानाच भेसळीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर दुधातील भेसळ रोखण्यासाठी देशभर ही भेसळ ओळखणार्‍या 28 हजार प्रयोगशाळांचे जाळे विणण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. 

गेल्या आर्थिक वर्षात देशात दुधाचे उत्पादन हे 186.7 दशलक्ष टन एवढे झाले तर दुधाचा दरडोई वापर हा 394 ग्रॅम एवढा झाला आहे. दहा वर्षांपूर्वी हेच प्रमाण 121.8 दशलक्ष टन व दरडोई वापर हा 290 ग्रॅम एवढा होता. दुधाच्या तुटीच्या भागात दुधाचा महापूर योेजना राबवून डॉ. व्ही. कुरियन यांनी देशभर धवल क्रांती घडविली. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अ‍ॅथॉरिटीज ऑफ इंडियाच्या तपासणीत दुधातील भेसळ उघड झाली आहे.

महाराष्ट्रातही अन्‍न व औषध प्रशासन आणि दुग्ध विकास विभागाने दुधाची जागेवरच तपासणी करण्यासाठी तसेच दर्जाबाबत खात्री करून घेण्यासाठी मोबाईल व्हॅन सुरू केली आहे. त्यामध्ये दुग्ध विकास विभागातील केमिस्टमार्फत तपासणी केली जाणार आहे. सध्या ही व्हॅन पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांत तपासणीचे काम करणार आहे.

त्याचवेळी देशभर दूध भेसळ ओळखण्यासाठी आणि ती रोखण्यासाठी केंद्र सरकार 28 हजार प्रयोगशाळांचे जाळे विणणार आहे. दुधामध्ये केमिकलचे प्रमाण रोखण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. दुधाळ जनावरांना दिल्या जाणार्‍या चार्‍यातून बर्‍याचदा रासायनिक खतांच्या मिश्रणाने दुधातील केमिकलचे प्रमाण आढळत असल्याचे निरनिराळ्या अहवालात म्हटले आहे.