Mon, Mar 25, 2019 04:55
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › 'तुझ्यात जीव रंगला' च्या अनामिक चित्रांची दुनिया (video)

'तुझ्यात जीव रंगला' च्या अनामिक चित्रांची दुनिया (video)

Published On: Feb 08 2018 6:35PM | Last Updated: Feb 08 2018 6:37PMनिलेश पोतदार : पुढारी ऑनलाईन, कोल्हापूर 

कधी काळी चित्रं रेखाटनं म्हणजे माझा जीव मी रेखाटतोय असचं वाटायचं. पण, ती गोष्ट होती चाळीस वर्षांपूर्वीची. घरची जबाबदारी, शेती, संसार आणि मुलं यांचा गुंता मोठा होता. त्यावेळी चित्रापेक्षा संसार मला, आणि माझ्या घराच्यांना महत्वाचा वाटला म्हणून चित्रं थांबवून मी संसाराकडं वळलो. संसारकडं आलो असलो तरी मनात असणारी चित्रं आकार घेत होती, आणि ती घेतच राहिली मग ती चित्रांची साखळी मी कधी थांबवली नाही ती अजूनपर्यंत सुरूच आहे. कातर स्वरात आपला चित्रप्रवास सांगताना पार्श्वनाथ गाट भावूक होतात. पेनच्या साहाय्यानं रेखाटलेली चित्रशैली एका पाठोपाठ एक उलघडत राहतात, त्यातच पुन्हा चित्रांच्या दुनियेत रममाण होतात. 

पार्श्वनाथ गाट यांची दुसरी ओळख म्हणजे, दूरचित्रवाहिणीवरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगाला ही गाट यांच्या वाड्यात चित्रित करण्यात येत आहे.  वय वर्षे ७२. सडपातळ शरीरयष्टी आणि चित्रातील नाजूक रेषेसारखाच नाजूक असा आवाज असणाऱ्या पार्श्वनाथ यांच्या चित्रमैफलीची सफर करताना वाटते की, छंद माणसाला जगवतात आणि जगण्यातच रमवतात. 

कधी काळी चित्रकला शिक्षक असणारे पार्श्वनाथ यांना चित्रांविषयी बोलतं केलं तर ते चित्रांविषयी मनमुरादपणे बोलत बसतात. एका एका चित्राचा प्रवास उलघडून सांगताना ते म्हणतात, 'एखादं चित्रं हातात घेतलं की, तीन ते चार तास कसे निघून जातात ते सांगता येत नाही. चित्र पुरं झाल्याचं मोठं समाधान मिळतं ते या वेळेपेक्षा कितीतरी पटीने मोठं असतं.'

वसगडे (ता. करवीर, कोल्हापूर) येथील गाट वाड्याचे मालक पार्श्वनाथ गाट यांची ओळख होण्याचे कारण चर्चेत आले ते 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या चित्रीकरणामुळे. हा वाडा गाट यांचा असला तरी आता राणादांचा वाडा अशीच ओळख सध्या झाली आहे. राणादांच्या या मालिकेमुळे आता हा वाडा घराघरात पोहचला आहे. त्यामुळे कोल्हापूरात येणारे पर्यटक हमखास या वाड्याला भेट देतात, फोटो काढतात, सेल्फी काढून घेतात. पर्यटकांच्या या सगळ्या घाईगडबडीत एक व्यक्ती मात्र चित्रांच्या रेषेत गडून गेलेली असते. मालिकेतील वाडा प्रत्यक्षात बघताना आनंद घेणाऱ्या पर्यटकांसमोर मग पार्श्वनाथ हे त्यांच्या चित्रांची मैफल घेऊन उभे राहतात, तेव्हा वाडा बघितल्याचा आनंद पर्यटकांच्या चेहऱ्यावर असतोच मात्र रेषांच्या जादूमय वातावरणात सगळा परिसर क्षणात हरवून जातो. 
चित्रात जीव रंगाला

वयाची ७२ वर्षे पार करूनही बॉलपेनच्या चित्रांची मालिका पाहिली की,  गाट यांच्या छंदाची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. पार्श्वनाथ यांना लहानपणापासूनचं चित्रांची आवड त्यांचं सातवी पर्यतचं शिक्षण वसगडे येथेच झालं. त्यानंतर अकरावीपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये. चित्रकलेची आवड त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. म्हणून गाट यांनी पापाची तिकटी इथल्या जी. आर. वडणगेकर, लक्ष्मीपुरीतील दळवीज्आर्टस येथे दत्तोबा दळवी यांच्याकडे  चित्रकलेचं प्रशिक्षण घेतलं. मात्र घरातील जबाबदारीमुळे त्यांनी चित्रांच्या छंदाला थांबवून संसार, शेती आणि घराकडं आपलं मन वळवले. हे सर्व करीत असताना त्यांच्या आयुष्यात दु:खाच्या एका चित्रानं हेलावून सोडलं. त्यांच्या पत्नीच्या निधनाने त्यांचा भावनिक आधार निखळला, नंतरच्या काळात मात्र त्यांना सावरले ते चित्रांच्या रंगीबेरंगी रेषेने. 

या वेळी चित्रकलेनचं त्यांची सोबत केली आणि जगण्याचा विश्वास दिला. आपल्यातील चित्रकला जिवंत राहावी यासाठी गाट यांनी चित्रे रेखाटायला सुरूवात केली. यावर ते भावूक होऊन सांगतात की, मुली आपल्या संसारात असल्यातरी त्यांनी मला कधी एकटं पडू दिलं नाही, पण मी स्वत:लाच चित्रात रमवून घेतलं म्हणून त्या काळातील एकांतवासातील प्रवास सुखकर नसला तरी त्यातुन बाहेर पडायला मला या चित्रांनी साथ दिली असल्याचेही ते सांगतात.

पार्श्वनाथ गाट यांनी चित्रकलेसाठी बॉलपेनचं माध्यम निवडलं आहे. गाठ यांनी विविध रंगीत बॉलपेनच्या माध्यमातून आणि स्वत:च्या कलात्मकतेतून रंगीत फुले, पाने, वेली, पक्षी, प्राणी, रेखाटायला सुरूवात केली. यामध्ये त्यांनी इंग्लिशमधील अक्षरांची शैली आकारला आणली आहे. यात पाना फुलांच्या सुरेख मखरेत  विविधरंगी छटांचं वळनदार इंग्रजी अक्षरांचं नाव साकारण्यात तर त्यांचा खास हातखंडा आहे.

गाट यांनी प्रामुख्याने विविध रंगी पंक्षी, प्राणी, विविध रंगी फुले बॉलपेनमधून रेखाटण्यास प्राधाण्य दिले. नुसती चित्रे न रेखाटता स्त्री भ्रूण हत्या, दया, करूणा, प्रेम, वात्सल्य, पशूप्रेम, पक्षी सौंदर्य हा विचार समोर ठेऊन चित्रे साकारली आहेत. त्यांची चित्रे काढल्यासारखी वाटत नाहीत, ती जीवंतपणाची साक्ष देतात.

चित्राविषयी बोलताना गाट म्हणतात, चित्र सहज सुंदर दिसत असली तरी एका चित्राला किमान तीन ते साडे तीन तास लागतात. त्यांच्या हाताची रेषेवर असणारी हुकूमत पाहिली की, ही चित्रं त्यांच्यासाठीच बनतात असचं वाटत राहतं आणि थांबता थांबता सांगतात जीवनाची संध्याकाळ एकांतात असली तरी, चित्रं साथसंगत देत राहतात. म्हणून जगण्यातील आनंद घेता येतो, असं सांगत ते जाणाऱ्यांना निरोप देतात आणि पुन्हा नव्या चित्रांच्या रेषांत रमून जातात.