होमपेज › Kolhapur › कैद्यांना मोबाईल, बॅटर्‍या पुरविण्याचा प्रयत्न

कैद्यांना मोबाईल, बॅटर्‍या पुरविण्याचा प्रयत्न

Published On: Apr 15 2018 1:33AM | Last Updated: Apr 15 2018 1:33AMकोल्हापूर : दिलीप भिसे

कळंबा कारागृहात शिक्षा भोगणार्‍या कैद्यांना मोबाईल, अद्ययावत बॅटर्‍या बुटाच्या कप्प्यातून पुरविण्याचा प्रयत्न करणार्‍या कारागृह रक्षकाला प्रवेशद्वारावरच अन्य सुरक्षारक्षकांनी रंगेहाथ पकडले. बालाजी मुंढे (वय 45) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून मोबाईल, दोन किमती बॅटर्‍या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर सुरक्षारक्षक मुंढेची तूर्त बिंदू चौकातील सबजेलकडे तडकाफडकी बदली झाली आहे.

मुंढेच्या संशयास्पद हालचालीची अधीक्षक शरद शेळके यांना माहिती लागल्याने त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी दुपारी दोन वाजता त्याची ड्युटी असतानाही सायंकाळी साडेसातपर्यंत ड्युटीवर आला नव्हता. रात्री आठ वाजता मुंढे ड्युटीवर आला.

प्रवेशद्वारावरील अन्य रक्षकांना त्याचा संशय आला. अन्य रक्षकांनी त्याला खोलीत नेऊन अंगझडतीचा प्रयत्न केला. त्याने दाद दिली नाही. अखेर सर्व रक्षकांनी घेराव घालून अंगावरील कपडे, बूट, सॉक्सची तपासणी केली असता, बुटात लहान आकाराचा मोबाईल, सॉक्समध्ये फुल चार्जिंगच्या दोन बॅटर्‍या आढळून आल्या.सुरक्षारक्षकांनी शेळके यांच्याशी संपर्क साधला. यावेळी वस्तू जप्त करण्यात आल्या. निलंबनाबाबत लवकरच कारवाई शक्य आहे, असे पोलिस अधीक्षक शेळके यांनी सांगितले. वरिष्ठाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार कारवाई होईल, असेही ते म्हणाले. यापूर्वी पुण्यातही त्याचे निलंबन झाले होते.