Thu, Jan 17, 2019 01:51होमपेज › Kolhapur › ट्रक-दुचाकी अपघातात कणेरीचे दोघे तरुण ठार

ट्रक-दुचाकी अपघातात कणेरीचे दोघे तरुण ठार

Published On: Jun 30 2018 9:02PM | Last Updated: Jun 30 2018 9:02PMउजळाईवाडी : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मयूर पेट्रोल पंपासमोर ट्रकने दुचाकीस्वारांना मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात जवान सुशांत आनंदा पाटील (वय 24) व ओंकार विश्‍वास पाटील (दोघे रा. कणेरी, ता. करवीर) जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.सुशांत पाटील चार वर्षांपूर्वी सैन्यदलात भरती झाला होता. सध्या तो जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होता.

 पंधरा दिवसांपूर्वी तो सुट्टीवर आला होता. ओंकार पाटील याचा कडबाकुट्टी मशिन तयार करण्याचा व्यवसाय असून, तेथे वडिलांच्या हाताखाली तो काम करत होता.
शनिवारी कामानिमित्त सुशांत व ओंकार कोल्हापूरला आले होते. उजळाईवाडी उड्डाण पुलावरून दोघे महामार्गावर आले. यावेळी मालवाहतूक ट्रक पुण्याहून बंगळूरकडे जात होता. भरधाव ट्रकने पुढे असलेल्या दुचाकीला मयूर पेट्रोल पंपावरील वळणावर मागून जोराची धडक देत या दोघांना दुचाकीसह सुमारे वीस ते पंचवीस फूट फरफटत नेले. हायवे पेट्रोलिंग जीपमधून त्यांना खासगी दवाखान्यात नेण्यात आले; पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

सुशांत पाटील यांच्या वडिलांचे वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्याच्या मागे आई, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. ओंकार पाटील याच्या मागे आई, वडील असा परिवार आहे. हे दोघेही मनमिळावू असल्याने दोघांचा मित्रपरिवार मोठा होता. अपघाताची माहिती मिळताच मित्र परिवार व कणेरी येथील ग्रामस्थ घटनास्थळी तसेच सीपीआर येथे जमा झाले होते.