Thu, Mar 21, 2019 23:27
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना अभिवादन

स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना अभिवादन

Published On: Apr 20 2018 1:18AM | Last Updated: Apr 19 2018 11:19PMकोल्हापूर : प्रतिनिधी

इसवी सन 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात कोल्हापूरकर आघाडीवर होते. क्रांतिकारकांनी संपूर्ण जिल्हाभर इंग्रजांविरोधात सशस्त्र लढा उभारला. 20 डिसेंबर रोजी क्रांतिकारकांनी ‘शनिवार केचरी’त अ‍ॅसिड बॉम्ब टाकून ती पेटवून दिली. वरच्या मजल्यावरील खिडकीतून बॉम्ब टाकण्यात आला. यासाठी क्रांतिकारकांनी एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून मानवी मनोरा केला होता. 

दुसरे दिवशी 21 डिसेंबर रोजी स्वातंत्र्यसैनिक बाबुराव महाडिक यांच्या घरातील दुसर्‍या मजल्यावरील खोलीत बॉम्बचा स्फोट झाला. यात क्रांतिकारी जखमी झाले. या घटनेला यंदा 75 वर्षे पूर्ण झाल्याने याच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने आज-उद्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पै. बाबा राजेमहाडिक व शरद तांबट यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

असा आहे बॉम्बस्फोटाचा स्फूर्तिदायी इतिहास

भारत देश स्वातंत्र्य व्हावा यासाठी सुरू असणार्‍या स्वातंत्र्य लढ्याअंतर्गत 1942 ला महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’ ची घोषणा देत ब्रिटिशांच्या अन्यायी-अत्याचारी राजवटीला निर्वाणीचा इशारा दिला. यामुळे संपूर्ण देशभर क्रांतिकारकांनी कारवाया सुरू केल्या. कोल्हापूरकर यात आघाडीवर होते. 20 डिसेंबर 1942 यादिवशी स्वातंत्र्य सैनिक बाबुराव महाडिक, म्हादू पार्टे, शांताराम भक्‍ते,  चंद्रकांत खत्री, शामराव मेवेकरी, शंकर गवळी या सहकार्‍यांसोबत मानवी मनोरा उभा करून शनिवार कचेरी अ‍ॅसिड बॉम्बने पेटवून दिली. दुसरे दिवशी दि. 21 डिसेंबर 1942 रोजी बाबुराव महाडिक यांच्या शिवाजी पेठेतील घराच्या वरच्या मजल्यावर बॉम्ब तयार करताना त्याचा मोठा स्फोट झाला.

प्रचंड आवाजने भिंतींना तडे गेले. घरातील गृहोपयोगी वस्तूंचा चक्‍काचूर झाला. संपूर्ण खोलीत अ‍ॅसिड-गंधक-काचा-खिळे व स्फोटाचे साहित्य विखुरले. धुरांचे लोट परिसरात निर्माण झाले. स्फोटात महाडिक यांचे स्नेही व सहकारी म्हादू पार्टे, चंद्रकांत खत्री, शांताराम भक्ते, राम घोरपडे जखमी झाले. बाबुराव महाडिक यांच्या पत्नी गरोदर असतानाही त्यांनी स्फोटानंतर इतरत्र विखुरलेल्या वस्तू गोळा करून कोणाला समजायच्या आत खंबाळा तलावात टाकल्या. घरातील रक्ताचा सडा स्वच्छ करून संपूर्ण खोली तातडीने सारवली. 

घरासमोर जमलेल्या लोकांना हाकलून लावले. गर्दीतून क्रांतिकारकांनाही सुरक्षितरित्या बाहेर काढले. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी बाबुराव महाडिक यांनी स्वत:च्या अंगावर घेतली. त्यांनी आपल्या एकाही साथीदाराचे नाव सांगितले नाही. त्यांना 10 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. या  घटनेच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने अमृतमहोत्सवी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन पै. बाबा राजेमहाडिक यांनी केले. पत्रकार परिषदेस युवराज राजेमहाडिक, शिवराज राजेमहाडिक, विश्‍वजित साळोखे, प्रसन्न तोहर, संग्राम घोरपडे आदी उपस्थित होते. 

विविध कार्यक्रमांचे आयोजन

शनिवार कचेरीच्या इमारतीत सध्याचे सिटीसर्व्हे कार्यालय आहे. या ऐतिहासिक वास्तूची माहिती नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने या इमारतीवर 20 डिसेंबर 1942 च्या क्रांतिकारी बॉम्बस्फोटाचा स्फूर्तिदायी इतिहास सांगणारा फलक लावण्यात येणार आहे. याचे अनावरण आणि शालेय विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा संयुक्‍त उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, दि. 20 रोजी सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होईल. तसेच शनिवार, दि. 21 रोजी सायंकाळी 5 वाजता, शिवाजी पेठेतील तटाकडील तालीम ते स्वातंत्र्य सैनिक बाबुराव महाडिक चौक येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.