Tue, Feb 19, 2019 20:48होमपेज › Kolhapur › 28 लाख वृक्षांची होणार लागवड

28 लाख वृक्षांची होणार लागवड

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jun 30 2018 11:45PMकोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारच्या 50 कोटी वृक्षलागवड या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून यंदा कोल्हापूर जिल्ह्यात 28 लाख 71 वृक्षांची लागवड केली जाणार आहे. कोल्हापूरसह सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी विभागांतर्गत 1 कोटी 22 लाख 52 हजार वृक्ष लावले जाणार आहेत.

रविवारी (दि. 1) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी साडेनऊ वाजता शेंडा पार्क येथे वृक्षारोपणाचा मुख्य कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील व उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्‍ल यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, वृक्षारोपणाचे चित्रण ड्रोन कॅमेर्‍याच्या माध्यमातून केले जाणार आहे. 

मुख्य वनसंरक्षक पाटील म्हणाले, गतसाली झालेल्या वृक्षारोपणातील 90 टक्के वृक्ष जगले आहेत. वृक्षलागवडीचे खड्डे खणण्यात आले आहेत. रोपेसुद्धा तयार आहेत. वन विभागासह सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद, वनविकास महामंडळ आदींसह सर्वच स्तरांवर वृक्षारोपण केले जाणार आहे. 

उपवनसंरक्षक शुक्‍ल म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात 1 जुलैपासून शहरासह बाजारभोगाव, तळसंदे आदींसह तालुकास्तरावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम होणार आहेत. वृक्षारोपण केलेली माहिती व छायाचित्रे वन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड केली जाणार आहेत. खासगी वृक्षारोपण करणार्‍यांनी यासाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅपवर माहिती अपलोड करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. गतसाली व्यक्‍ती व संस्थांकडून 1 लाखाहून अधिक वृक्षलागवड केली. त्यामुळे यंदाही लोकसहभाग वाढवण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे  सीईओ डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून 4.50 लाख वृक्षलागवड केली जाणार आहे.