Thu, Aug 22, 2019 08:26होमपेज › Kolhapur › ’ही’ झाडे लावा... डासांना पळवा!

’ही’ झाडे लावा... डासांना पळवा!

Published On: Aug 12 2018 1:01AM | Last Updated: Aug 12 2018 1:01AMकोल्हापूर : विजय पाटील  

शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत डेंग्यू आणि चिकुनगुणियाने हात-पाय पसरले आहेत. इवलासा डास डंख मारतो आणि माणूस थंडी-तापाने कुडकुडतो. चार-सहा दिवस रुग्णाला अ‍ॅडमिट करून उपचार करावे लागतात. जिथं माणसं तिथं डासांचे थवे, असं चित्र आहे. आता या डासांना पिटाळण्यासाठी गवती चहा, तुळस, निरगुडी, सब्जा आदी वातावरणात सतत गंध सोडणार्‍या वनस्पती लावा, असा सल्ला वनस्पती तज्ज्ञांकडून देण्यात आला. 

शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूची साथ आटोक्यात आलेली नाही. चिकुनगुणिया, मलेरियाचे रुग्णही वाढत आहेत. या आजारांचा प्रादुर्भाव करणार्‍या डासांचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. आरोग्य विभाग अपयशी ठरला असताना पुढाकार घेऊन नागरिकही डास निर्मूलनाची मोहीम राबवत नसल्याचे दिसत आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढल्याने रुग्णांची संख्याही त्यापटीत वाढली आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग, जिल्हा मलेरिया विभाग, आरोग्य उपसंचालक आदींसह जबाबदार यंत्रणा फक्त कागदोपत्री जनजागरणाचा फार्स करून हात वर करत आहेत. या जबाबदार व्यवस्थांची अकार्यक्षमता समोर आली असताना आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थाही शांत आहेत. तावातावाने लोकांच्या सार्वजनिक समस्यांविषयी बोलणारे तज्ज्ञ, कार्यकर्ते (?) सुद्धा गप्प आहेत. दोन-तीन महिन्यांपासून सुरू असलेला डासांचा उपद्रव सुरूच आहे. यापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या चाव्याने रेबीज झाल्याने मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या प्रकाराबाबतही कार्यवाही आणि कार्यवाहीच्या नावाने हालचाल दिसत नाही.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वनस्पतिशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. एस.आर. यादव यांनी डासांचा उपद्रव रोखण्यासाठी वनस्पतींचा उपयोग करण्याची सूचना केली आहे. डॉ. यादव यांचे म्हणणे आहे की, आपल्याकडच्या गवती चहा,  तुळस, निरगुडी, सब्जा या वनस्पती हवेत चोवीस तास ऑरेमेटिक ऑईल (सुवासिक तेलसदृश) सोडत असतात. या गंधामुळे डास पळून जातात. 

कारण, डासांना हा वास त्रासदायक वाटतो. त्यामुळे घरासमोर, घराच्या पाठीमागे, तसेच परिसरात या वनस्पती लावाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. ज्या ठिकाणी सांडपाणी साचते अशा ठिकाणी कर्दळ, दोन फूट वाढणारी केळी अशा वनस्पती लावल्या, तर अशा पाण्यातही डासांची पैदास होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.