Wed, Jul 17, 2019 18:35होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : दुसर्‍या दिवशीही वाहतूकदारांचा संप

कोल्हापूर : दुसर्‍या दिवशीही वाहतूकदारांचा संप

Published On: Jul 22 2018 1:01AM | Last Updated: Jul 21 2018 11:02PMकोल्हापूर : प्रतिनिधी

विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार्स ट्रान्स्पोर्ट काँग्रेस नवी दिल्‍ली व महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाच्या वतीने सुरू असलेले   देशव्यापी चक्‍काजाम आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरूच होते. या बंदचा अद्याप जनजीवनावर परिणाम झाला नसला, तरी जिल्ह्यातील 70 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

नियमित होणारी डिझेल, पेट्रोल दरवाढ रद्द करावी, टोल प्रक्रिया पारदर्शक करावी, थर्ड पार्टी प्रीमियममधील वार्षिक दरवाढ रद्द करा, पर्यटन वाहनांसाठी दीर्घ मुदतीचे ऑल इंडिया परमिट द्यावे, जीएसटी, ई-बिलातील अडचणी व भाडे देण्यासाठी होणारा विलंब यात सुधारणा करावी या आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवार (दि. 20) पासून बेमुदत देशव्यापी चक्‍काजाम आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनात शहर व जिल्ह्यातील विविध संघटनांचे दहा हजारांहून अधिक ट्रकचालक सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी ट्रकमधील माल उतरून घेण्यास परवानगी देण्यात आली होती; पण आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे शनिवारी लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या वतीने भरारी पथक तयार करण्यात आले. मार्केट यार्ड, रेल्वे गुडस् यार्ड येथील मालाची वाहतूक बंद करून परराज्यांतील ट्रक रस्त्याकडेला लावण्यास भाग पाडले. मार्केट यार्डमधील मालाची आवक-जावक बंद असल्याने हमालांचे काम बंद झाले आहे. या बंदमधून औषध, पालेभाज्या व दूध वगळण्यात आले आहे.

याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव म्हणाले, शहरात कोणत्याही मालाची आवक व जावक होऊ दिली नाही. महामार्गावर जे ट्रक वाहतूक करताना दिसले त्यांना अडवण्यात आले आहे. चक्‍काजाम आंदोलनाची घोषणा पूर्वी केली होती. त्यामुळे आठ ते दहा दिवसांचा जीवनावश्यक वस्तूंचा साठा व्यापार्‍यांनी करून ठेवला आहे. त्यामुळे अजून सामान्यांना या आंदोलनाची झळ बसलेली नाही; पण सोमवारनंतर याचा परिणाम दिसून येईल, असे सांगितले.