Sun, Jul 21, 2019 12:05होमपेज › Kolhapur › महानगरपालिकेत वाहतेय बदल्यांचे वारे

महानगरपालिकेत वाहतेय बदल्यांचे वारे

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 10:52PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिकेतील तब्बल ऐंशी अधिकारी-कर्मचार्‍यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या. अधीक्षकांपासून कनिष्ठ लिपिकापर्यंतच्या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या. यात तीन वर्षांपासून तब्बल 21 वर्षांपर्यंत एकाच विभागात आणि एकाच टेबलला ठाण मांडून बसलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांचा समावेश आहे. येत्या चार दिवसांत वर्ग-4 मधील आणखी पाचशेहून अधिक कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. बदल्यांमुळे कर्मचार्‍यांत कहीं खुशी... कहीं गम... असे वातावरण होते. 

आस्थापनावरील वर्ग-2 व वर्ग-3 संवर्गातील ज्या अधिकारी, कर्मचार्‍यांची सेवा एका विभागात तीन वर्षांपेक्षा जास्त झाली आहे. त्यांच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने करण्यात आल्या. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड यांनी बदल्यांची प्रक्रिया राबविली. बदली झालेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी तीन दिवसात बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. हजर न होणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांचा अहवाल संबंधित विभागप्रमुखांनी आयुक्तांना द्यायचा आहे. त्यानंतर बदली होऊनही हजर न झालेल्या कर्मचार्‍यांना थेट निलंबित करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. 

अधिकारी-कर्मचार्‍यांना बदल्यांचे पर्याय देण्यात आले होते. यापूर्वी ज्या विभागात काम केले तो आणि सध्या कार्यरत असलेला विभाग सोडून अन्यत्र कोठे बदली पाहिजे त्याचे पर्याय द्यायचे होते. अधिकारी-कर्मचार्‍यांच्या पसंतीने बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. स्थायी समिती सभागृहात स्क्रीन लावून विविध विभागांची माहिती देण्यात आली होती. घरफाळा विभागातील अधीक्षक विश्‍वास कांबळे यांची शहर अभियंता कार्यालयात अधीक्षकपदावर बदली झाली. सहायक अधीक्षक बळवंत सूर्यवंशी यांची आरोग्य विभागातून पवडी, अशोक यादव यांची पवडी विभागातून एलबीटी विभागात, किरण पाडवी यांची शहर अभियंता कार्यालयातून प्रशासन देईल त्या विभागात बदली झाली. 

वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी अधिकारी-कर्मचारी राहिल्याने कार्यालयात ये-जा करणार्‍यांशी त्यांचे ‘लागेबांधे’ निर्माण होऊ नयेत. त्यातून भ्रष्टाचाराला खतपाणी मिळू नये. या उद्देशाने शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा नियम झाला. एकाच टेबलला जास्तीत जास्त तीन वर्षे सेवा करावी, असा शासन नियम आहे; पण महापालिकेत हा नियम अक्षरशः ‘पायदळी’ तुडवला जात असल्याचे वास्तव आहे. सुमारे सातशेच्यावर अधिकारी-कर्मचार्‍यांनी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ‘ठिय्या’ मारला आहे. त्या-त्या कार्यालयात त्यांची ‘मक्तेदारी’ झाली असल्याने त्यांची ‘बडदास्त’ केल्याशिवाय नागरिकांचे काम होत नसल्याचे वास्तव आहे. मोठ्या प्रमाणात ‘खाबूगिरी’ वाढलेली आहे. नगररचना विभागातील भ्रष्टाचारामुळे तर नागरिक मेटाकुटीस आले आहेत. 

फिरतीच्या नावाखाली अधिकारी-कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचे यापूर्वी अनेकवेळा उघड झाले आहे. त्याबरोबरच विभागीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. महापालिकेत यापूर्वी कधीच मोठ्या प्रमाणात बदल्या झालेल्या नाहीत. काही कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या, तरीही राजकीय हस्तक्षेपामुळे संबंधित कर्मचारी आहे त्याच विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याचे सांगण्यात येते.  काही अधिकारी तर रोज एका ठेकेदाराला गाठून पार्टीचे ‘गणित’ घालत असल्याचे चर्चा आहे.

दैनिक ‘पुढारी’मध्ये 3 मे रोजी ‘ठराविक अधिकारी-कर्मचार्‍यांची मक्तेदारी... मोठ्या प्रमाणात खाबूगिरी,’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने एकूणच कोणते अधिकारी-कर्मचारी किती वर्षे एकाच विभागात कार्यरत आहेत याची माहिती जमा करण्यास सुरुवात केली. एकेका विभागाचा आढावा घेऊन बदल्यांसाठी यादी तयार करण्याचे काम सुरू केले. काही दिवसांपूर्वी 11 कनिष्ठ अभियंते आणि अधीक्षकासह इतर चौघांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर आता पुन्हा 80 अधिकारी-कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या. दैनिक ‘पुढारी’मधील वृत्ताची गंभीर दखल घेऊन महापालिका प्रशासनाने बदल्यांची कार्यवाही सुरू केली.  

बदल्यांत आयुक्त कार्यालयाला सूट!

विविध विभागांत तीन वर्षांपासून एकाच ठिकाणी ठिय्या मारलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांची आयुक्त डॉ. चौधरी यांनी अत्यंत काटेकोर बदली प्रक्रिया राबवून उचलबांगडी केली. परंतु, बदल्यांत आयुक्त कार्यालयातील तीन वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचार्‍याला सवलत दिल्याची चर्चा महापालिका कर्मचार्‍यांत सुरू होती. आयुक्त कार्यालयात दोन लिपिक असून, त्यापैकी वरिष्ठ लिपिक विष्णू कर्‍हाड हे चार वर्षांपासून तेथे आहेत. बदल्यांच्या यादीत त्यांचेही नाव होते. परंतु, त्यांची बदलीच झाली नाही. याबाबत अधिकारी-कर्मचार्‍यांतून उलट-सुलट चर्चा सुरू होती. परिणामी, बदल्यांत आयुक्त कार्यालयाला सूट... अशी चर्चा महापालिकेत सुरू होती.