होमपेज › Kolhapur › गडहिंग्लज : स्थलांतरीत झालेले अतिरिक्त पोलिस अधिक्षक कार्यालय कायम राहणार 

गडहिंग्लज : स्थलांतरीत झालेले अतिरिक्त पोलिस अधिक्षक कार्यालय कायम राहणार 

Published On: Sep 05 2018 8:48PM | Last Updated: Sep 05 2018 8:48PMमुंबई : वार्ताहार
कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भाग व कर्नाटक राज्य हद्दीवर गडहिंग्लज येथे पूर्वी कार्यरत असणारे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाचे कामकाज सध्या इचलकरंजी येथून सुरू आहे. परिणामी यामुळे या परिसरामध्ये असणाऱ्या गुन्हेगारीच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही बाब गंभीर असून गडहिंग्लज येथे कार्यरत असणारे अतिरिक्त पोलिस अधिक्षक कार्यालय कायम ठेवण्याचे निर्देश गृहराज्य मंत्री दीपकभाई केसरकर यांनी बुधवारी (ता.५) रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये दिले.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज उपविभागांतर्गत राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज व चंदगड या तालुक्यांचा समावेश होतो हे सर्व तालुके पूर्णपणे ग्रामीण, दुर्गम व डोंगराळ असून गडिंग्लज व चंदगड या तालुक्यांना कर्नाटक सीमा राज्याची हद्द जोडून आहे व आजरा तालुक्याला कोकण व गोव्याची हद्द जोडून आहे. यामुळे या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी चे प्रमाण आहे. यामुळे याठिकाणी खून, चोऱ्या, घरफोडी, वाहन चोरी, अवैध दारू वाहतूक यासह अन्य गुन्हे राजरोसपणे सुरू आहेत. याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी गुन्ह्यांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. गडहिंग्लज येथील कार्यरत असणारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय काही कारणास्तव इचलकरंजी येथे  स्थलांतर करण्यात आले होते ते पूर्ववत गडहिंग्लज येथे कायम केल्यास गुन्ह्यांच्या संख्येत घट होण्यास मदत होणार असल्याची बाब आमदार आबिटकर यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी बोलताना गृह राज्यमंत्री दिपकभाई केसरकर म्हणाले की, कोल्हापूर येथे पोलिस आयुक्तालयाची स्थापना होत नाही तोपर्यंत गडहिंग्लज येथे ४ दिवस व इचलकरंजी येथे ३ दिवस अशाप्रकारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी काम पाहावे व आयुक्तालयाची निर्मिती झाल्यानंतर गडहिंग्लज येथील कार्यालय पूर्णवेळ कार्यरत ठेवण्याचे निर्देश मंत्रीमहोदयांनी दिले.

तसेच राधानगरी तालुक्यातील राधानगरी पोलीस स्टेशन इमारत बांधकामाकरीता १ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी पोलिस महासंचालक कार्यालय मुंबई यांनी पोलिस अधिक्षक कोल्हापूर यांचेकडे मे २०१८ मध्ये वर्ग करण्यात आला असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी प्राप्त होऊन राधानगरी पो. स्टे. काम निविदा प्रक्रियेमध्ये आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच काम सुरु  करण्याच्या सूचना यावेळी मंत्रीमहोदयांनी दिल्या.

भुदरगड तालुक्यातील गारगोटी पोलीस स्टेशन करिता १ कोटी ६५ लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून सदरचे काम सुरू करण्याकरिता निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करून त्वरित याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्रीमहोदय दिले.

आजरा पोलीस स्टेशन इमारत उर्वरित बांधकामा करिता नव्याने १ कोटी ६५ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून उर्वरित निधी लवकरात लवकर उपलब्ध करून इमारत ताब्यात घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. याकरिता जुन्या इमारतीची पाहणी करण्याकरिता अतिरिक्त पोलीस अधीक्षक व कार्यकारी अभियंता दक्षिण यांनी संयुक्त पाहणी करून याबाबतचा अहवाल त्वरित शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले.तसेच आजरा पोलीस स्टेशन शेजारून  मदरसा कॉलनी कडे जाणारा रस्ता ८ फूट रुंद आहे. हा रस्ता रुंद करून कॉलनीतील नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली. याबाबत गृह विभाग व सा.बां. विभाग यांनी प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहुन अहवाल द्यावा असे मंत्रीमहोदयांनी सूचना केल्या.

यावेळी या बैठकीस आमदार प्रकाश आबिटकर, धैर्यशील भोसले, सुधीर हिरेमठ सहा. पोलीस महानिरीक्षक (सेवा), विनायक देशमुख सहा. पोलीस महानिरीक्षक (हौसिंग), उपसचिव वेंकटेश भट, अतिरिक्त पोलीस अधिक्षक कोल्हापूर श्रीनिवास घाटगे, कार्यकारी अभियंता (दक्षिण) नारायण वेदपठाक आदी उपस्थित होते.